NCP Sarkarnama
मराठवाडा

NCP News : राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनेत्रा पवारांनाही जुमानेनात? चर्चेचे आमंत्रण देऊनही आपासातच भिडले! महापालिका सभेत खडाजंगी

Sunetra Pawar NCP Beed : बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली. सुनेत्रा पवार यांनी समजूत काढून देखील नगरसेवकांमधील गटबाजी थांबलेली नाही.

Jagdish Pansare

Beed Politics : बीड नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती यांच्यातील अंतर्गत वारंवार उफाळून येत आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या आपल्या बीड दौऱ्यात या नगरसेवकांची समजूत काढली होती. मुंबईत चर्चेसाठी या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी या नाराज नगरसेवकांना दिला होता.

परंतु हे नगरसेवक, पदाधिकारी काही केल्या ऐकायला तयार नाहीत. पालकमंत्र्यांनी सांगूनही नगरपालिकेच्या सभेत पुन्हा तेच पदाधिकारी एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. या नगरसेवकांना नेमके कोणाचे पाठबळ आहे? की जे पालकमंत्र्यांनाही जुमानत नाहीयेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे विरोधक एका संधीच्या शोधात आहेत, तर त्यांना सत्ताधारी नगरसेवक वारंवार संधी देत आहेत.

बीड नगरपालिकेच्या राजकारणात विरोधकांनी शड्डू ठोकण्याची अजिबात गरज उरलेली नाही, कारण सत्ताधारी पक्षातील स्वतःला धुरंधर समजणारे नेतेच एकमेकांचे वस्त्रहरण करण्यात व्यस्त आहेत. बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादाचे जाहीर प्रदर्शन झाले.

नगराध्यक्ष प्रेमलात पारवे आणि उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारूख पटेल आणि काही सभापती यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा पेटला. आता चक्क मंजूरीसाठी आलेल्या ठरावात फेरबदल केल्याच्या कारणावरून स्वच्छता सभापती आणि उपनगराध्यक्ष यांच्यात सभागृहातच जोरदार खडाजंगी झाली. विरोधक शांतपणे या अंतर्गत नाट्याचा आनंद घेत होते. सत्ताधाऱ्यांच्याच गोंधळामुळे पालिकेची सभा मात्र चांगलीच गाजली.

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू होती. मात्र, अजेंड्यावरील एका अत्यंत महत्त्वाच्या ठरावाचे वाचन होत असताना उपनगराध्यक्षाच्या हे लक्षात आले की, मूळ ठरावातील मजकुरात परस्पर बदल करण्यात आला आहे. मग काय? या बदलाचा रोख थेट नगराध्यक्षाच्या दिशेने गेल्याने सभागृहात एकाएकी राजकीय वातावरण तापले.

उपनगराध्यक्ष आक्रमक, शा‍ब्दिक चकमक

​आमच्या परवानगीशिवाय आणि विषय समितीला अंधारात ठेवून ठरावात फेरबदल करण्याचे धाडस झालेच कसे? असा थेट सवाल उपनगराध्यक्षांनी केला. यावरून स्वच्छता सभापतीही आक्रमक झाले आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नेमक्या याच मुद्द्यावरून एकाच पक्षातील लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्नाने काही काळ सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

नगरसेवक-नगराध्यक्ष भिडले

मुख्य वाद नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय मंजूर करण्याच्या पद्धतीवर आणि नगराध्यक्षांच्या कारभारावरून झाला. सभेत राष्ट्रवादीचे गटनेते फारुख पटेल यांनी स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी काही राष्ट्रवादी नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांच्यातही शाब्दिक खडाजंगी झाली.

तोडगा काय निघणार?

नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांचा गट विरुद्ध उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल आणि काही सभापती-नगरसेवकांचा गट, अशी विभागणी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे अलीकडे पक्षाच्या एका आंदोलनातही नगराध्यक्षांच्या गटापासून वेगळे राहून उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल, शहराध्यक्ष अमर नाईकवाडे आणि काही सभापती-नगरसेवकांनी स्वतंत्र मोर्चा काढला होता. आता या वादावर पालकमंत्री सुनेत्रा पवार नेमका काय तोडगा काढतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT