

NCP news : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या आज जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या बारामती विकासाच्या मॉडेलवर विश्वास ठेवत बीडच्या जनतेने नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिली. मात्र ही सत्ता राष्ट्रवादीला झेपेनाशी झाली आहे का? असा प्रश्न सध्याच्या कारभारावरून उपस्थित केला जात आहे.
बीड नगरपालिकेचा कारभार हाती घेऊन सहा महिने उलटून गेले तरी शहरातील नागरी समस्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. अंतर्गत गटबाजी आणि सत्ता संघर्षामुळे विरोधक त्यांच्यावर अक्षरशा तुटून पडले आहेत. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये केवळ चर्चा आणि भाषणे होत असून शहरातील पाणी, वीज, कचरा आणि आरोग्याचे प्रश्न जैसे थे असल्याचा हल्लाबोल प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने केला जात आहे.
बीड शहराच्या विकासाची सूत्रे हाती असणाऱ्या नगरपालिकेची तीन दिवस चाललेली मॅरेथॉन सर्वसाधारण सभा म्हणजे नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार प्रकार ठरला आहे. तीन दिवसांच्या तुफान गदारोळ, राजकीय टोमणे आणि अंतर्गत गटबाजीनंतर बीड करांचे प्रश्न मात्र तसेच पडून आहेत. तीन दिवसात अवघा एकच ठराव मंजूर होऊ शकल्याने नगरपालिकेच्या या कासवगती कारभारावर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
विकासकामांवर चर्चा करून बीडकरांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये रंगलेल्या राजकीय धुसफुसीमुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सभेच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना उघडे पाडण्यास सुरुवात केली. शहरातील बार्शी नाका ते बाजार तळ रस्त्याचा रखडलेला प्रश्न आणि कत्तलखाने तातडीने शहराबाहेर हलवण्याची आक्रमक मागणी करत त्यांनी सभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी बीड शहरातील 22 रस्त्यांसह 30 विकासकामांसाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या सर्व कामांची वर्क ऑर्डर होऊन तब्बल 5 महिने उलटले, तरीही ही कामे नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर अडवली आहेत? असा सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला. यावर सत्ताधाऱ्यांना उत्तर देता आले नाही.
दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते खुर्शीद आलम यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. शहरातील 12 रस्ते, चौक आणि महत्त्वाच्या पॉईंट्सची नावे बदलण्याच्या नगरपालिकेच्या धोरणावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकांची मागणी नसताना रस्ते अन् चौकांची नावे बदलून विनाकारण वाद निर्माण केले जात आहे. नावे बदलून शहराचा विकास होणार आहे का? त्यापेक्षा नागरिकांना मूलभूत सुविधा द्या, अशी मागणी करत त्यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. सत्ताधारी ज्या प्रभागात आवश्यकता नाही, तिथे निधी असं करत असल्याचा आरोपही त्यांनी केला तसेच या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
4 कोटींच्या निधीवरून सत्ताधारी भिडले
विरोधी पक्ष आक्रमक असतानाच, राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील अंतर्गत गटबाजी उघडपणे चव्हाट्यावर आली. गटनेते फारूक पटेल आणि अमर नाईकवाडे यांनी स्वकीयांवरच निशाना साधत स्वच्छता सभापती निजाम शेख यांच्यावर थेट हल्लाबोल केला. मागील आर्थिक वर्षातील साडेचार कोटी रुपयांच्या निधीवरून सत्ताधारी आमनेसामने उभे ठाकले. प्रभागात रस्त्यांचे व शौचालयाचे काम कुणाचे आणि निधी कुठे खर्च होतोय, यावरून सत्ताधारी सदस्य एकमेकांवरच तुटून पडल्याने सभेत प्रचंड गोंधळ उडाला.
गोपीनाथरावांचा पुतळा उभारा..
या वादळी सभेत भाजप नगरसेवक गोविंद शिराळे यांनी भाजप गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड पालिकेच्या प्रांगणात लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी लावून धरली.
नगराध्यक्षांचे मौन..
तीन दिवस चाललेल्या या संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामामध्ये आणि सदस्यांच्या एकेरी भाषेच्या वापरावर नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी पूर्णपणे मौन बाळगणेच पसंत केले. अध्यक्षांनी उत्तर द्यावे, असा आग्रह सदस्यांनी धरला तरी त्या शांत राहिल्या. अखेर उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनीच ढाल बनत उत्तरे दिली आणि पाण्याच्या प्रश्नासाठी प्रत्येक वॉर्डात 10 लाख रुपये खर्चाचा एकमेव ठराव मंजूर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.