

Beed Politics News : बीड नगरपरिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील गटबाजी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यानंतरही कायम आहे. डीपीडीसी बैठकीसह विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी सुनेत्रा पवार बीडमध्ये आल्या होत्या. त्याच्यासमोरच पक्षातील दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यांनी समजूत काढूनही फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर 'गुंगी गुडिया' म्हणत टीका केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सर्वत्र त्यांचा निषेध आणि आंदोलन करण्यात आले. बीडमध्येही पक्षाच्या वतीने आंदोलन झाले, पण दोन गटांनी स्वतंत्रपणे आंदोलन केल्याने पुन्हा एकदा गटबाजीचे प्रदर्शन झाले.
जिल्ह्यातील स्थानिक नेते, आमदार गटबाजी, नाराजी मिटली असे सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गेल्या काही काळापासून बीड नगरपालिकेच्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी केवळ पालिका सभागृहातील सर्वसाधारण सभा आणि बैठकांपुरतीच मर्यादित होती.
पण आता ती उघडपणे रस्त्यावरही दिसू लागली आहे. निषेध आंदोलनाच्या निमित्ताने सत्ताधारी राष्ट्रवादीतील फूट संपूर्ण बीड जिल्ह्याने पाहिली. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात केलेल्या बेताल व अशोभनीय वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येऊन ताकद दाखवणे गरजेचे होते.
मात्र, बीडच्या राजकीय आखाड्यात या संवेदनशील विषयावरूनही दोन गट आमनेसामने आले. स्वतंत्रपणे आपापले शक्तीप्रदर्शन करण्याची स्पर्धा या गटांमध्ये रंगली होती. गुरुवारी बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष गटाकडून बशीरगंज चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन करून, पुतळ्याला जोडे मारण्यात आले.
या आंदोलनापासून विरोधी गट अंतरावर राहिला. यानंतर शुक्रवारी उपनगराध्यक्ष, गटनेते आणि काही सभापतींनी आपला स्वतंत्र मोर्चा काढत पक्षातील अंतर्गत फुटीवर शिक्कामोर्तब केले. शुक्रवारी बशीरगंज चौकात उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगरपालिकेचे गटनेते फारुख पटेल आणि शहराध्यक्ष तथा नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली वेगळा निषेध मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात नगरपालिकेच्या सभापती आरती बनसोडे, नगरसेविका रेश्मा सरवदे, नगरसेविका मीना गोडसे, नगरसेविका सीता मोरे, नगरसेविका नुझत आरा, शाहबाज शेख, पठाण रेहाना यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
जीबीतील वाद थेट रस्त्यावर..
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय मंजुरीवरून आपापसातील राजकीय हिशोब चुकते करणारे दोन्ही गट आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या सन्मानाच्या मुद्द्यावरही एकत्र येण्यास तयार नाहीत, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. निषेध एक, पण मोर्चे दोन या प्रकारामुळे पक्षाची नाचक्की होत आहे. या गटबाजीमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाच्या भावना आहेत. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष गटांमधील हा भडका आगामी काळात नगरपालिकेच्या सत्तेवर आणि पक्षाच्या भविष्यावर काय परिणाम करतो, याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.