शितल वाघमारे
Dharashiv News : महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. डॉक्टरांकडून समावेशनासाठी पैसे, निवड झालेल्या उमेदवाराकडून पैसे, निविदा कामातून टक्केवारी आरोग्य मंत्री करीत आहेत. एकीकडे राज्याची आरोग्य व्यवस्था सलाइनवर असताना आरोग्यमंत्र्यांचे लक्ष मात्र कमिशनवर असल्याची टीका भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी केली आहे.
भूम येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील आठवड्यात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर भूम येथील मेळाव्यात आरोप केले होते. 'मी माझ्या काळात अनेक सिंचन योजना, विजेच्या योजना, शासकीय इमारती उभ्या केल्या आहेत. याची त्यांनी यादीही या वेळी वाचून दाखवली. जमिनीवरच्या लोकांची भावना मंत्र्यांना समजत नाही आणि ते उडत्याची मोजायला निघाले आहेत. हीच लोक मंत्र्यांची मापं काढणार आहेत. भूम येथे निवेदन देणाऱ्या लोकांचा अपमान केल्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. हीच जनता तानाजी सावंत यांना 2024 मध्ये लेझीम खेळायला लावणार आहे,' अशी घणाघाती टीका राहुल मोटेंनी पत्रकार परिषदेत केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'मंत्री येतात दुसऱ्या जिल्ह्यातून त्यांना त्यांच्या घरातून तालुक्यातुन हाकलून दिलं आहे. ते दोनदा कॅबिनेट मंत्री, आठ वर्षे आमदार, तरीही मतदारसंघात पाणी, तलाव, सब स्टेशन या कुठल्याही गोष्टी त्यांनी आणलेल्या नाहीत. महाराष्ट्राची जनता त्यांना खेकडा मंत्री, वसुली मंत्री आणि हपकीन मंत्री म्हणून ओळखते. मी केलेल्या आरोपांची उत्तरं त्यांनी बगलबच्चे यांना देण्यासाठी न सांगता त्यांनी स्वतः द्यावेत, असे आवाहन राहुल मोटे यांनी केले.
निवडणुका आल्या की मुरूम टाकला एक दोन लाखांची पोकलेन मशीन लावली, जेसीबी लावली, कुठेतरी नदी, नाले-खणले अशा पद्धतीची मलमपट्टीचे काम आमचं नाही. सिंचनाचे क्षेत्र वाढले म्हणून तानाजी सावंत यांनी माझ्या मतदारसंघामध्ये खासगी कारखाना टाकला. सिंचन क्षेत्र वाढले नसते, विकास झाला नसता तर त्यांनी आपल्या मतदारसंघात कारखाना टाकलाच नसता. त्यांनी जो कारखाना टाकला आहे आज मी केलेल्या विकासकामांची पावती आहे.
माझ्यावर टक्केवारीचे आरोप केले, पण ते मोघम आणि त्याला कसलाही पुरावा नाही. सावंत (Tanaji Savant) यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात अनेक गैरव्यवहार केले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आठ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांचे टेंडर दवाखान्यांना कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीसाठी निविदा काढली होती. आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवल्यामुळे सरकारला ती रद्द करावी लागली. खासदार संजय राऊत यांनीही महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांना आरोग्य खात्यामध्ये समावेश करण्यासाठी डॉक्टरांकडून प्रतिचार लाख रुपये गोळा केले आहेत. असे एकूण 50 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप सावंत यांच्यावर केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या आरोग्य उपसंचालक उमेदवारांकडूनही पैसे मागण्यात आले होते.
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालयातील एका बेडसाठी एक लाख रुपये घेतले जातात. संचालक पदासाठी 40 ते 50 लाख, उपसंचालकासाठी 30 ते 40 लाख, जिल्हा आरोग्य अधिकारी /जिल्हा शल्य चिकित्सकसाठी 25 ते 30 लाख, वैद्यकीय अधिकारी अधिकाऱ्यासाठी दोन ते पाच लाख, रुपयांचे दर पत्रक त्यांनी जाहीर केले होते. आतापर्यंत आरोग्यमंत्री सावंत यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे खंडन कधीही केलेले नाही. तसेच परभणीच्या खासदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत ग्रामपंचायत निधी संदर्भातही टक्केवारीचा आरोप सावंत यांच्यावर केला होता.
Edited By : Rashmi Mane