Tanaji Sawant, Manoj Jarange Patil  Sakarnama
मराठवाडा

Tanaji Sawant Meet Jarangae Patil : तानाजी सावंत, अंबादास दानवेंचे 'या' विषयावर झाले एकमत; मुख्यमंत्र्यांशी बोलले...

Jagdish Pansare

Chhatrpati Sambhajinagr News : मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आलो होतो. जरांगे पाटील यांची प्रकृती पाहता त्यांची चिंता वाटते. त्यांचे उपोषण लवकर सुटावे आणि समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. या विषयावर लवकरच तोडगा काढण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे, आरोग्य मंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ही माझ्यासोबत मुख्यमंत्र्यांशी बोलले. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आमच्या दोघांमध्ये एकमत असल्याचे, प्रा. डाॅ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाच्या सहाव्या दिवशी सावंत त्यांच्या भेटीसाठी दुपारी अंतरवालीत आले होते.

जरांगे पाटील यांच्यांशी ते चर्चा करत असतानाच तिथे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Amabdas Danve) आले. या दोघांनी जरांगे पाटील यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या सगळ्या मोर्चामध्ये मी सहभागी होतो. मी मराठा कार्यकर्ता म्हणून जरांगे यांना भेटायला व पाठिंबा देण्यासाठी आलो आहे.

जरांगे यांचे उपोषण लवकर सुटावे व मागणी मंजूर करावी यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना बोललो आहे. आत्तापर्यंत जे मराठा समाजाचे मोर्चे निघाले त्यात आम्ही सहभागी होतो. उपोषण बाबत मी व अंबादास दानवे दोघे एकाच मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना बोललो. लवकरच यावर तोडगा निघेल, असेही सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, असेही सावंत म्हणाले. दरम्यान, मंत्री शंभुराजे देसाई, खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना एक महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न, सगेसोयरे निर्णयाची अंमलबजावणी, शिंदे समितीला मुदतवाढ आणि मराठा तरुणांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले.

जरांगे पाटील यांनी शंभुराजे देसाई यांच्या शब्दावर विश्वास ठेवत सरकारला 13 जुलैपर्यंत म्हणजे एक महिन्याची मुदत देत असल्याचे जाहीर करत उपोषण स्थगित केले. निश्चितच या कालावधीत सरकार निर्णय घेईल, असा विश्वास तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.

(Edited by : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT