महावीर जालन
ईट (जि. धाराशिव) : ‘‘राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्वतःच्या वाकाव गावची आणि माढा तालुक्याची काळजी घेतली असती, तेथील विकास कामे केली असती तर माढा मतदारसंघामध्ये त्यांच्या भावाचा तीन वेळा पराभव झाला नसता. ’’ अशी जोरदार टीका माजी आमदार राहुल मोटे सावंत यांच्यावर केली. (Tanaji Sawant should worry about Vakao and Madha : Rahul Mote)
पंचवीस वर्ष घरात आमदारकी होती. पण, स्मशानभूमी बांधता आली नाही. मी विकासाचा बॅकलॉग भरून काढतोय, अशी टीका एका कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी माजी आमदार राहुल मोटे (Rahul Mote) यांच्यावर केली होती. त्याला मोटे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
मोटे म्हणाले की, मी स्वतः गिरवली गावच्या स्मशानभूमीसाठी २०२०-२०२१ मध्ये २५/१५ मधून सात लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्याचा कार्यारंभ आदेश ८ फेब्रुवारी २०२२ रोजी मिळाला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे काम थांबले होते. त्यामुळे गावातील सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी स्मशानभूमीचे काम करण्याचे नियोजन चालू होते. निधीची अडचणी या कामाला नव्हती.
पालकमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिले आहे, ते खोटे व दिशाभूल करणारे आहे. सर्वे नंबर सहामध्ये स्मशानभूमी झाली पाहिजे, असा आग्रह पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन केला आहे. यामुळे जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. मी आमदार नसताना गिरवली गावामध्ये एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आमदार असताना दहा कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे, असेही मोटे यांनी स्पष्ट केले.
मोटे म्हणाले की, माझ्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम, बस स्थानक, सार्वजनिक सभागृह, गावांतर्गत रस्ते, पाण्याची टाकी, गावांतर्गत पाइपलाइन, हायमास्ट दिवे, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाड्या, व्यायाम शाळा आदी कामे केलेली आहेत. स्मशानभूमीचा प्रश्न गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सोडविला आहे. त्यात पालकमंत्र्यांनी तोंड खुपसू नये. त्यांचे स्वतःचे गाव हे मतदारसंघात असते, तर त्याची तुलना गावच्या विकासाबाबत करता आली असती ते मतदारसंघात गेटकेन आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव येथील ते आहेत. त्यांच्या गावामध्ये मंत्री झाल्यापासून एक रुपयाचाही निधी दिलेला नाही. उलट आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय शिंदे यांनी त्यांच्या वाकाव गावात निधी दिलेला आहे. त्यांनी वाकाव गावची व माढा तालुक्याची काळजी घेतली असती तर त्यांचा त्या मतदारसंघात तीन वेळा पराभव झाला नसता, असे टीकास्त्र राहुल मोटे यांनी सोडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.