Chhatrapati Sambhajinagar : गेल्यावर्षी तेलंगणातून महाराष्ट्रात घोंघावत आलेले भारत राष्ट्र समितीचं ( BRS ) गुलाबी वादळ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शमले. नांदेडमार्गे मराठवाडा, महाराष्ट्र आणि देशात 'बीआरएस'च्या विस्ताराचे स्वप्न घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( KCR ) आले होते. परंतु, तेलंगणातील गेलेली सत्ता आणि नंतर झालेल्या अपघातात 'केसीआर' जायबंदी झाले.
लोकसभा निवडणूक ( Loksabha Election 2024 ) अवघ्या तीन महिन्यांवर असताना 'बीआरएस' त्या लढवणार की नाही? मराठवाडा आणि महाराष्ट्रातील 'बीआरएस'चे नेते आता काय भूमिका घेणार? अशा चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. अशातच आता 'बीआरएस'चे हे गुलाबी वादळ पुन्हा महाराष्ट्रात धडकणार आहे. अपघातातून सावरलेले केसीआर पुढील आठवड्यात पुण्यातील आपल्या पक्ष कार्यालयाचे उद्धाटन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मराठवाड्यातील 'बीआरएस'चे समन्वय समितीचे सदस्य कदीर मौलाना यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तत्पूर्वी येत्या चार-पाच दिवसांत हैदराबाद येथे महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. 'बीआरएस'च्या तेलंगणातील नेत्यांशी बैठकीसंदर्भात दुरध्वनीवरून चर्चा झाली असून राज्यातील सर्व समन्वयकांना सूचना देण्याचे सांगण्यात आले आहे.
"या बैठकीनंतर 'बीआरएस'च्या पुणे येथील कार्यालयाचे उदघाटन केसीआर यांच्या हस्ते होणार आहे," असं मौलाना यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चलबिचल असलेल्या मराठवाडा व महाराष्ट्रातील 'बीआरएस'च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. केसीआर पुन्हा सक्रिय झाल्याने आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासंदर्भात हैदराबादेत होण्याऱ्या बैठकीत ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याच बैठकीत लोकसभेनंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचीही प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याचे समजते. घरात पाय घसरून पडल्यानंतर दोन महिन्यांपासून केसीआर डॉक्टरांच्या सल्ल्यानं विश्रांती घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून ते आता चालू-फिरू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठका घेण्याचे ठरवले असून, आठवडाभरातच ते महाराष्ट्रातही येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.