NCP Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

NCP (SP) Assembly Election 2024 : तक्रारी नको, निवडून कसे येणार ते सांगा ? मुलाखतीतील प्रश्नावर इच्छुकांची दांडी गुल..

Tell me how you get elected? Direct question in NCP interview : राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी, सहकार क्षेत्राकडे असणारे दुर्लक्ष, संघटनात्मक बळाचा अभाव, चंद्रकांत दानवे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांचे बंड यामुळे तालुक्यात पक्षाची दुरावस्था झाली आहे.

Tushar Patil

NCP Political News : विधानसभेच्या भोकरदन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुकांची संख्या सगळ्याच राजकीय पक्षांकडे वाढली आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर विरोधकांनी भोकरदन- जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष दानवे यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीकडून सहाजिकच संतोष दानवे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेल्या या जागेवर काँग्रेसनेही दावा सांगितला आहे.

उमेदवारीसाठी चुरस सुरु असतानाच शनिवारी पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निसर्ग बंगल्यावर इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. भोकरदनमधील इच्छुकांना सकाळी अकरा वाजताची वेळ देण्यात आली होती. मुलाखती दरम्यान, इच्छुकांनी जेव्हा ऐकमेकांची उणीदुणी काढायला सुरवात केली, तेव्हा तक्रारी नको, निवडून कसे येणार ते सांगा? असे थेट विचारले आणि इच्छुकांची दांडीच गुल झाली.

भोकरदन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे, परंतु गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला येथे पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी, सहकार क्षेत्राकडे असणारे दुर्लक्ष, संघटनात्मक बळाचा अभाव, चंद्रकांत दानवे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांचे बंड यामुळे तालुक्यात पक्षाची दुरावस्था झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली.

परंतु लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव करून महाविकास आघाडीने लोकसभेच्या जालना मतदारसंघात विजय मिळवला आणि राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (NCP) मराठा आरक्षण, जरांगे फॅक्टर महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना महाविकास आघाडीकडून टार्गेट करण्यात आले आहे.

शनिवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती स्वतः शरद पवार यांनी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेखा लहाने, जाफराबादचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, लोकजागर अभियानाचे अध्यक्ष केशव जंजाळ, श्रीरंग जंजाळ या चार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सुरेखा लहाने यांनी महिला उमेदवाला प्राधान्य दिले जावे, असे सांगत शैक्षणिक पात्रतेचा विचार करता संधी मिळावी, अशी अपेक्षा केली.

तसेच आपण डमी उमेदवार असणार नाही, असे सांगत स्पर्धक इच्छुकांना टोला लगावला. 2016 पासून आपण पक्षाचे एकनिष्ठपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरे इच्छुक उमेदवार केशव जंजाळ यांनी मात्र भोकरदन तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशा पद्धतीने पीछेहाट झाली, याचा पाढाच वाचला. पाच वेळेस उमेदवारी देऊन देखील राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यात चंद्रकांत दानवे अयशस्वी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवाय चंद्रकांत दानवे यांचे मूळ गाव हे बदनापूर मतदार संघात असून छत्रपती संभाजीनगर ते भोकरदन दररोज अपडाऊन करणारे ते नेते असल्याचा आरोप केला. तर लोकजागर अभियानाच्या माध्यमातून मतदार संघातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये व आंदोलनात मीच सक्रिय असल्याचा दावाच केला. मराठा आरक्षणात संपूर्ण तालुका पिंजून काढला असून यंदा निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे जंजाळ यांनी सांगितले.

सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर इतरांनी काय केले व पक्षाची काय अवस्था आहे हे सांगण्यापेक्षा तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या जमेच्या बाजू , तुम्ही कशा पद्धतीने निवडून येणार व तुम्हालाच का उमेदवारी द्यावी, हे फक्त स्पष्ट करा अशी समज देण्यात आली. शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार बजरंग सोनवणे व राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे प्रमुख उपस्थित होते.

मुलाखतीसाठी दोन दिवस आधी निरोप देण्यात आले होते. भोकरदन मतदार संघात चंद्रकांत दानवे यांना होणारा विरोध व ऐन मुलाखतीच्या वेळी त्यांची असणारी अनुपस्थिती राजेश टोपे यांनी सुरेखा लहाने व केशव जंजाळ यांना गेल्या काही वर्षात दिलेले राजकीय बळ यामुळे भोकरदन मतदार संघात राष्ट्रवादीची तुतारी कोण फुंकणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT