Sharad Pawar : सत्तेसाठी आठवू लागले पवार; संधिसाधू ‘तुतारी’ वाजवणार

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार यांनी 1999 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची 2024 मध्ये दोन शकले झाली. 30 ते 40 वर्षे शरद पवारांच्या आशीर्वादाने सत्ता-पदांचा पूर्णपणे उपभोग घेतलेल्या नेत्यांनी सत्तेसाठी अजित पवारांना साथ दिली.
sharad pawar
sharad pawar sarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला चांगले यश मिळाल्यानंतर अजित पवार गटातील अनेक नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ‘तुतारी’ फुंकण्यास सुरुवात केली आहे.

शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी 1999 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची 2024 मध्ये दोन शकले झाली. 30 ते 40 वर्षे शरद पवारांच्या आशीर्वादाने सत्ता-पदांचा पूर्णपणे उपभोग घेतलेल्या नेत्यांनी सत्तेसाठी अजित पवारांना साथ दिली. आयुष्यभर पवारनिष्ठ असल्याचे सांगणाऱ्यांनी आपल्या निष्ठा अजित पवार यांच्या प्रेमापोटी नाही तर ‘सत्तेसाठी’ काही तासांत गुंडाळल्याचे महाराष्ट्राने पाहिले. अशा या सत्तापिपासू नेत्यांना थारा देण्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला होता. मात्र, काही काळातच संघटनेला उपयुक्त ठरतील त्यांना परत घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. आता तर अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांना प्रवेश देण्याची तयारी सुरू आहे.

sharad pawar
Vidhan Sabha Election 2024 : नव्या समीकरणांची चाहूल...

अजित पवार गटाचे 10 ते 15 आमदार ‘घरवापसी’च्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याकडे उमेदवारीची आणि सत्तेची संधी मिळणार नसल्याचे दिसताच या संधीसाधू नेत्यांना घरवापसीचे वेध लागले आहेत.

पुन्हा ‘घरवापसी’ सत्तेसाठीच

अजित पवार हे नाराज होते. त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्यापेक्षा प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या मंडळींनी आपला पक्ष सोडल्याचा धक्का मात्र शरद पवार यांना बसल्याशिवाय राहिला नसेल. या धक्क्यातून सावरतच, त्यांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधण्याची, तरुणांना संधी देण्याची घोषणा केली.

sharad pawar
Mahayuti Politics : भाजपसाठी 'बूस्टर', 'बार्गेनिंग पॉवर' वाढणार; काँग्रेस, शिंदे गटाला भानावर येण्याचा संदेश

पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले प्रमाणिक कार्यकर्तेही पेटून उठले. शरद पवारांसाठी ते पुन्हा हाडांची काडं आणि रक्ताचे पाणी करण्यासाठी सिद्ध झाले. ‘गेले ते कावळे, राहिले ते मावळे’ अशी घोषणा देत उरलेल्या कार्यकर्त्यांनी पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. शिल्लक राहिलेल्या नेत्यांनी भ्रष्ट लोक गेल्याने पक्षाचे शुद्धीकरण झाल्याचे जाहीर केले. मात्र, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नीलेश लंके, बजरंग सोनवणे यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. अजित पवार गटात लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, याची त्यांना खात्री पटल्यानंतर लोकसभेच्या उमेदवारीसाठीच ते शरद पवार यांच्याकडे परतले. या दोघांना शरद पवार यांनी उमेदवारी देऊन निवडूनही आणले. जर उमेदवारी देण्याचा शब्द दिला नसता तर ही मंडळी शरद पवार यांच्याकडे पुन्हा आली असती का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सत्तेसाठीच ‘तुतारी’ हाती घेणार

आगामी काही दिवसात अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार शरद पवार यांच्या प्रेमापोटी किंवा निष्ठेपोटी न येता अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’त उमेदवारी किंवा सत्तेची संधी दिसत नसल्याने ते घरवापसी करणार आहेत. अशा या सत्तालोलूप, दुटप्पी लोकांना पुन्हा आपल्या ‘राष्ट्रवादी’चे दरवाजे उघडून शरद पवार हे महाराष्ट्रातील जनतेला आणि ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांना काय संदेश देणार आणि तो जनतेच्या कितपत पटणार, हे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच.

आजची स्थिती मात्र शरद पवार यांच्या दमदार नेतृत्त्वाच्या आधारे निवडणुकीत विजयी होण्याची मनसुबे अनेकांनी बांधले आहेत. त्यामुळे यापुढे पक्षात पुन्हा येऊ इच्छिणाऱ्यांबाबत शरद पवार काय भूमिका घेतात. ऐनवेळी पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात परत घेतल्यावरून टीकाही होण्याची शक्यता आहे.

काहींना परत घेण्याचा आग्रह का?

अजित पवार यांच्यासोबत गेलेले जे आमदार, पदाधिकारी पक्ष संघटनेसाठी उपयुक्त असतील, त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाईल तर ज्यांनी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला त्यांना पक्षात घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. मात्र, जे गेले त्यांच्यामुळे पक्षाची हानी झाली असून, जाणाऱ्यांनी पक्ष कमकुवत केलाच, हे जगजाहीर आहे. तरीही सोईस्कर भूमिका ठेवत काहींना परत घेण्याचा आग्रह नेमका कोण आणि कशासाठी करत आहे, याचे उत्तर ‘राष्ट्रवादी’च्या प्रमुखांनी शोधणे आवश्यक आहे.

पवारांनी अखंड सावधान राहावे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘शरद पवार’ हीच एक मोठी ताकद आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारही पवार यांच्यावरच भिस्त ठेवून पक्षप्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी अनेक नेत्यांनी भाजपच्या नेत्यांशी कसा, किती वेळा संपर्क केला हे सांगण्यात येते. सध्या शरद पवार यांच्यासह असणारे काही नेतेही त्यात सहभागी होते, असे अजित पवार यांनी अनेकदा स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काहींनी भाजपच्या गोटात चाचपणीही केली होती. भाजपने ‘राष्ट्रवादी’त फोडाफोडी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या योजनेअंतर्गत तर हे लोक पक्षात येत नसावेत ना? यावरून आज ना उद्या भाजप ‘राष्ट्रवादी’तील कोणाची ‘विकेट’ काढू शकते, त्यामुळे पक्षप्रमुख शरद पवार यांना लक्ष द्यावे लागेलच.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com