Omprakash raje nimbalkar nirmala sitharaman Sarkarnama
मराठवाडा

Budget 2024 : "निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न, पण...", निंबाळकरांची टीका

Omprakashraje Nimbalkar : "... अन् सरकारचं धोरण शेतकरीविरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं", अशी टीकाही ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी केली.

Shital Waghmare

Budget 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना गुरूवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सहावा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून 'विकसित भारता'चे स्वप्न निर्मला सीतारमण यांनी दाखवलं. या अर्थसंकल्पावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी टीका केली आहे. अर्थसंकल्पात वाढलेल्या महागाईबाबत 'ब्र' शब्द काढला नाही, असं टीकास्र ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी डागलं आहे.

ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, "दरवर्षी शेतीबाबत किमान आकडेवारी देऊन धुळफेक केली जात होती. यंदाही तेच केल्याचं दिसत आहे. सरकारचं धोरण शेतकरीविरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. हे हंगामी अर्थसंकल्प असल्यानं गेल्यावर्षी केलेल्या घोषणांची पूर्ती झाली का? हे सांगणं आवश्यक होते. पण, त्याकडे निर्मला सीतारमण यांनी दुर्लक्ष केलं."

"मागील वर्षी शेतकरी कल्याण मंत्रालयाला सव्वा लाख कोटी रुपये दिले होते. पण, उदिष्टपूर्तीबाबत मौन बाळगल्याने फक्त घोषणा करणारं सरकार अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. मागच्या घोषणांचा विसर तर पुढच्या घोषणांचा पाऊस अशी निराशाजनक अवस्था अर्थसंकल्पात दिसत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन देशातील जनतेला आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. पण, सर्वच घटकांचा भ्रमनिरास केला असून महाराष्ट्राचीही घोर निराशा केली आहे," असं ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी म्हटलं.


(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"खोटं बोल पण रेटून बोलणे ही सरकारची चाल आहे. महिला, युवा, अन्नदाता, गरीब वर्गाला महत्वाचं मानून अर्थसंकल्प सादर करत असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. पण, सीतारमण यांच्या काळातच या वर्गाच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. युवा वर्ग, बेरोजगारीचा सामना करत आहे. पण,सरकार युवा वर्गाची केवळ दिशाभूल करत आहे. शेतकऱ्यांचीही थट्टा लावली आहे. कांदा शेतकऱ्यांना रडवत असताना सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही," असं ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी सांगितलं.

"शेतकरी बांधवांना वार्षिक तोकडी रक्कम देऊन काय होणार? आमच्या स्वाभिमानी शेतकऱ्यांना फुकटचे काही नको, पण हक्काचे जे आहे ते तरी द्यावे एवढीच अपेक्षा आहे. मात्र, केंद्रात भाजपं सरकार आल्यापासून शेतकरी बांधवांची थट्टा लावली आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. गरीब हा अतिगरिब आणि श्रीमंत हा अतिश्रीमंत होत चालला आहे," असं मतही ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी व्यक्त केलं.

"सरकारनं सर्वच वर्गाची थट्टा लावली आहे. पण, खोटं बोल पण रेटून बोल म्हणीप्रमाणे अगदी छातीठोकपणे सर्वांच्याच तोंडाला सरकार पाने पुसत आहे. थोडक्यात एवढेच सांगेल 'ये पब्लिक है ये सब जानती है,'" असं म्हणत ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी अर्थसंकल्पावरून भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे.

Edited By : Akshay Sabale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT