Nanded News : हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीमध्ये दावे-प्रतिदावे सुरू होते. जालना लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला आणि हिंगोलीची जागा काँग्रेसला दिली जाणार अशी चर्चा होती. परंतु शिवसेना ठाकरे गटाने हिंगोलीतून माजी आमदार नागेश आष्टीकर यांची उमेदवारी जाहीर करत या सगळ्या शक्यतांना पूर्णविराम दिला.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ठाकरेंनी हिंगोलीत नागेश आष्टीकर यांच्या माध्यमातून मराठा कार्ड खेळल्याची चर्चा त्यांच्या उमेदवारीनंतर होताना दिसते आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदेंसोबत गेले होते. या गद्दारीचा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आष्टीकर यांना मैदानात उतरवले असून, आता ते महायुतीशी भिडणार आहेत.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील चार जागेवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, परभणी या चार मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या निवडणूकीत शिवसेनेने या जागा लढविल्या होत्या. त्यापैकी संभाजीनगर वगळता तिन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. हिंगोलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटणार हे निश्चित मानले जात होते.
या जागेवर शिवसेना ठाकरे गट कोणाला उमेदवारी देतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या निवडणुकीत या जागेवर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार हेमंत पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची चांगली पकड आहे.
हिंगोलीतून लढण्यासाठी शिवसेना ठाकरे गटात माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा हे उत्सुक होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाला पसंती दिली. हादगाव विधानसभा मतदारसंघाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी 2014 ते 2019 दरम्यान प्रतिनिधित्व केले. त्यांचे वडील दिवंगत बापूराव पाटील आष्टीकर हे दोन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचाच राजकीय वारसा नागेश आष्टीकर पुढे चालवत आहेत.
त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून, त्यांनी 2009 ते 2014 मध्ये तालुका प्रमुख म्हणून काम केले होते. तसेच आष्टी गावचे ते सरपंचही होते. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेल्या नागेश आष्टीकर यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पणन महासंघाचे संचालक अशा विविध जबाबदाऱ्याही आष्टीकर यांनी पार पाडल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकीय आणि सहकार क्षेत्रात नाव असलेल्या नागेश आष्टीकर यांच्यासारख्या वजनदार नेत्याला लोकसभेची उमेदवारी देत ठाकरे गटाने महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेचे दोन्ही शिलेदारांमध्येच लढत होईल. ही लढत मराठवाड्यातील प्रमुख लढतीपैकी एक असेल.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.