Omraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Om Raje Nimabalkar: जनता दरबारात पुन्हा निघाला 'तो' विषय; ओमराजे म्हणाले, "आता मी सत्तेत, तुझा डीपी होणार"

Om Raje Nimabalkar : दोन टर्म खासदार राहिलेल्या ओमराजे यांनी दोन अडीच वर्षातच मी विरोधी पक्षात असल्यामुळे मला निधी मिळत नाही, असा सूर लावायला सुरूवात केली होती.

Jagdish Pansare

Om Raje Nimabalkar: ऑपरेशन टायगरचा शिकार झालेले धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी "मी खासदार असून साधा एक ट्रान्सफार्मर बदलून देऊ शकत नाही, कारण मी विरोधीपक्षात असल्यामुळं मला निधी मिळत नाही" असे सांगून पक्ष बदलला होता. यावरून लोकांनी त्यांच्यावर 'लबाड' म्हणत टीका केली. आता ओमराजे सत्ताधारी पक्षात आहेत, त्यामुळं औसा येथील जनता दरबारात जेव्हा एका शेतकऱ्याने पुन्हा 'डीपी' मिळत नसल्याची तक्रार मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्याकडे केली, तेव्हा ओमराजे यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितही चकीत झाले.

ओम राजेनिंबाळकर हे शिवसेनेत फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. या निष्ठेचे फळ त्यांना धाराशीवमधून दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देऊन ठाकरे यांनी दिले होते. ओमराजे यांच्या प्रामाणिकपणामुळे धाराशीवच्या मतदारांनी त्यांना तब्बल 3 लाख 29 हजार मतांच्या फरकाने निवडून दिल्लीत पाठवले. दोन टर्म खासदार राहिलेल्या ओमराजे यांनी दोन अडीच वर्षातच मी विरोधी पक्षात असल्यामुळे मला निधी मिळत नाही, असा सूर लावायला सुरूवात केली होती. लोक काम करून देखील मशाल चिन्हावर मत देत नाहीत, साधा एक ट्रान्सफार्मर मी बदलून देऊ शकत नाही, अशी उद्विग्नता व्यक्त करू लागले होते.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या मोहिमेला वेग आला आणि नाही नाही म्हणणारे ठाकरेचे सहा खासदार या ऑपरेशनचे शिकार झाले. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशीव या तीनही खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मतदारांना त्यांचा हा निर्णय पटला नाही, त्यांना मतदारसंघात विरोध झाला. पण पक्ष सोडून गेलेले खासदार हे मतदारसंघाच्या विकासकामासाठी आम्ही हा निर्णय घेतला यावर ठाम होते.

ओम राजे निंबाळकर यांना धाराशीवमध्ये पक्षांतरानंतर मोठा विरोध झाला. विकासकामांसीठी पक्ष बदलला या त्यांच्या दाव्याला लोक 'लबाड' म्हणून हिणवत होते. याचे शल्य ओम राजे यांच्या मनात अजूनही असल्याचे औसा येथील जनता दरबारात दिसून आले. प्रभात नावाच्या एका शेतकऱ्याने या जनता दरबारात आपल्याला मागणी करूनही डीपी मिळत नसल्याची कैफियत मांडली. ओम राजे यांच्या दुखऱ्या नसेवरच जणू या शेतकऱ्याने बोट ठेवले असाच काहीसा हा प्रसंग होता. यावर ओम राजे यांनी डीपीडीसीतून पालकमंत्री तुझ्या डीपीला निधी देतील, यादीत तुझे नाव आले आहे, त्यामुळे तुला डीपी मिळेल, असे सांगितले.

पण बहुदा या शेतकऱ्याला या आधी ही ओम राजे यांनी डीपी संदर्भात आश्वासन दिले असावे, म्हणून त्याने जुनी आठवण त्यांना करून दिली. तेव्हा काहीशा वैतागलेल्या स्वरात ओम राजे म्हणाले, "अरे बाबा आधी मी विरोधी पक्षात होतो, तेव्हा मला निधी मिळत नव्हता. मग मी तुला डीपी कसा बसवून देणार? हे खरं आहे की नाही, पण आता मी सत्ताधारी पक्षात आहे, लोक मला लबाड म्हणत होते, तेव्हा आता तूच लोकांना आणि मीडियाला सांग की खरंच ओम राजेंना ते विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळत नव्हता आणि माझा डीपी राहीला. ओम राजे यांच्या या वैतागलेल्या उत्तराने उपस्थितही चकीत झाले. डीपी मिळाल्यावर सगळ्यांना सांग रे बाबा.." असेही ओमराजे शेवटी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT