

Sameer Rajurkar: मोठा गाजावाजा, कोट्यावधींचा निधी देऊनही छत्रपती संभाजीनगर शहरासाठी दिलेली पाणीपुरवठा योजना काही केल्या पूर्ण होताना दिसत नाही. या कामात अनेक विघ्न येत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, त्यांचे अधिकारी, काम करणारे कंत्राटदार यांच्यातील असमन्वय यामुळं मुदत उलटून गेली तरी पाणीयोजना पूर्ण झाली नाही. 1,380 कोटींची ही योजना 2,700 कोटींवर गेली तरी संभाजीनगरकरांच्या घशाला असलेली कोरड शांत झालेली नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागांसह सत्ता मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित पारदर्शक कारभाराचा निर्धार करत तरुण तडफदार महापौर समीर राजूरकर यांनी कामाला सुरूवात केली. मात्र, पाणीपुरवठा योजनेच्या कामाबद्दल कंत्राटदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी यांच्याती समन्वयाच्या अभावाचा फटका वीस लाखांवर शहवासियांना बसतो आहे. पाणी प्रश्नावर एवढा गाफील कारभार पाहता महापौर समीर राजूकर यांना ही योजना पूर्ण होणार कधी? याचे टेन्शन आलं आहे. आपल्या कार्यकाळात योजना पूर्ण व्हावी, नागरिकांना चोवीस तास मुबलक पिण्याची पाणी उपल्बध व्हावं, अशी त्यांची प्रमाणिक इच्छा आहे.
परंतू योजनेच्या कामात सातत्याने येणारे अडथळे, कंत्राटदारांकडून सुरू असलेले संथ काम, अधिकारी-कंत्राटदारांमध्ये समन्वयाचा अभावा या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा योजना रखडण्यावर होत आहे. त्यामुळे महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पाणीपुरवठा योजनेसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित कंत्राटदार, विभागीय आयुक्त, महापालिका यांची एकत्रित तातडीची बैठक घेणे गरजे असल्याचे सांगून तशी मागणी केली आहे.
पाणीपुरवठा योजनेची अपेक्षित प्रगती नसल्याचा ठपका ठेवत एका उपअभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. 2,750 कोटींच्या या महत्वाकांक्षी योजनेतील निकृष्ट कामे आता चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. याची यादी मोठी असून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत वाहून आणण्यात येणाऱ्या पाण्याला जागोजागी गळती लागली आहे. पाणी उपसाशाठीच्या पंपगृहांची ही अवस्था असल्याने जलवाहिनीतून प्रत्यक्ष पाणी नळात कधी येणार? हा खरा प्रश्न आहे.
अखेर महापालिका आयुक्तांच्या तंबीनंतर योग्य ती दुरूस्ती करून अतिरिक्त 30 ते 35 दशलक्ष लिटर पाणी वाहून आणता आले. तरीही कंत्राटदार कंपनी आणि जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमधील असमन्वय योजनेसाठी डोकेदुखी ठरत आहे. उद्धभव विहिरीतील गाळ काढण्यास झालेला विलंब, जॅक्वेलपर्यंत जाण्यासाठीच्या पुलाची नादुरूस्ती, अनेक व्हॉल्वमधील गळती, उघड्यावर असलेले फिल्टर हाऊस, बाराशे किलोमीटर शहरात टाकलेल्या जलवाहिन्याची रखडलेली जलदाब चाचणी याला कंत्राटदार जबाबदार असले तरी त्याचे खापर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर फोडले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
अशावेळी वरिष्ठ पातळीवरून संबंधितांना सूचना देणे आवश्यक असल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. शहरातील जलकुंभांना जोडण्यासाठीचे मुख्य काम कंत्राटदाराने अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे त्या भागांना पाणीपुरवठा करता येत नाहीये. कंत्राटदाराच्या ढिसाळपणाचा त्रास मात्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना होऊन त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी संबंधित विभागाकडून सातत्याने केल्या जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आपापल्या स्तरावर बैठका घेत असले तरी एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी आग्रही मागणी महापौर समीर राजूकर यांनी केली आहे.
महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी भेट घेऊन बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यावर तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानूसार बुधवारी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महापौर यांनी त्याचे आभार मानले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.