Aurangabad Crime News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Crime News : महिलेची छेड काढणाऱ्या ढुमेंचे निलंबन तर झाले, पण विभागीय चौकशी, दोषारोपपत्राचे काय ?

Marathwada : माझे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, सीपी माझे मित्र आहे, या दाव्याने त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईबाबत शंका उपस्थितीत होत आहे.

सरकारनामा ब्युरो

Police : महिनाभरापुर्वी औरंगाबाद शहरात एका विवाहित महिलेची सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे (Vishal Dhume) यांनी छेड काढत विनयभंग केल्याचे प्रकरण घडले होते. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग झाल्याने शहरवासियांची मान शरमेने खाली गेली होती. ढुमे यांच्यावर तातडीने कारवाई करावी यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, महिला संघटना देखील आक्रमक झाल्या होत्या.

त्यानंतर ढुमे यांना अटक होवून न्यायालयीन कोठडी आणि लगेच जामीनही मंजुर झाला. त्यामुळे पिडित महिलेसह संघटनांनी ढमे यांना तात्काळ निलिंबित करण्याची मागणी लावून धरली होती. (Aurangabad) एसीपी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे अधिकार स्थानिक पोलिस (Police) आयुक्तांना नसल्याने प्रकरण राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे गेले आणि तिथून ढुमे यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आले.

निलंबित झाल्याने जनतेच्या मनातील रोष कमी होईल असे वाटत होते, पण ढुमे यांनी माझे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, सीपी माझे मित्र आहे, या केलेल्या दाव्याने त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे. आज पिडित महिलेवरील विनयभंगाच्या घटनेला महिना उलटला, मात्र निलंबनापुढे पोलिसांची कारवाई पुढे सरकलेली नाही.

ढुमे यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कारवाईबद्दल अद्याप कुठल्याच हालचाली पोलिस महासंचालक कार्यालयाच्या पातळीवर नसल्याचे समजते. ज्या प्रकरणाने संपुर्ण राज्यात पोलिसांची नाचक्की झाली, त्या प्रकरणात ढुमे यांना वाचवण्याचा कोणी प्रयत्न करतयं का? अशी शंका देखील उपस्थितीत केली जात आहे.

निलंबनाच्या कारवाईनंतर विभागीय चौकशी, दोषारोपपत्रा बाबत काय सुरू आहे, याबाबत माहिती घेतली असतांना ते अधिकार स्थानिक पोलिस आयुक्तांना नाहीत. निलंबनाची कारवाई जशी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून झाली, तसेच विभागीय चौकशीचे आदेश देखील तिकडूनच येतील. त्यानंतर चौकशी, अहवाल आणि मग न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

त्यामुळे तुर्तास ढुमे हे निलंबित असून जामीनावर आहेत. यापुर्वी नगर येथे ढुमे यांच्या बाबतीत असेच प्रकार घडले होते, तेव्हा विभागीय चौकशी सुरू असतांनाच त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात देखील असेच काही घडणार का? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे या औरंगाबादेत आल्या होत्या.

तेव्हा त्यांनी ढुमे प्रकरणाची संपुर्ण माहिती पोलिस आयुक्तांकडून घेतली होती. तसेच ढुमे यांच्याविरोधात लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. १४ जानेवारी रोजी सहायक पोलीस आयुक्त ढुमे यांनी नाईट ड्युटीवर असताना रात्री दोनच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेड काढली होती. ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र आपल्या पत्नीसोबत त्याठिकाणी आले होते.

तिथे दोघांची भेट झाली, ढुमे यांनी आपल्याकडे गाडी नसल्याचे सांगत मित्राकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर मित्राने त्यांना आपल्या गाडीत बसवले. मात्र, गाडीत बसल्यानंतर ढुमे यांनी दारुच्या नशेत मित्राच्या पत्नीची छेड काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी वॉशरुमला जायचं कारण पुढं करत तुमच्या घरी घेऊन चला, अशी विनंती मित्राला केली. घरी गेल्यानंतरही ढुमे यांनी महिलेची छेड काढली. तसेच पीडित महिलेच्या पतीला मारहाण केली. यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT