Sanjay Shirsat Ministership News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat Ministership News : जिल्ह्याला शिरसाटांच्या रुपाने शिवसेनेचा तिसरा मंत्री मिळणार..

Marathwada : आगामी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेतल्या, तर सत्तार, भुमरे यांच्यापेक्षाही शिरसाट फायदेशीर ठरू शकतात.

Jagdish Pansare

Shivsena : राज्यमंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार अखेर उद्या किंवा परवा होण्याची शक्यता आहे. तशी तयारी मुंबईत सुरू असून शिंदे गटातल्या कुणाला संधी मिळणार? आणि कुणाचे मंत्रीपद जाणार? यावर चर्चा सुरू आहे. (Sanjay Shirsat Ministership News) औरंगाबाद पश्चिमचे तीन टर्म आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना मंत्रीपद मिळणार का? यावर देखील जिल्ह्यात खल सुरू आहे. एकाच जिल्ह्यात शिवसेनेचा तिसरा मंत्री कसा? असा प्रश्न देखील उपस्थितीत केला जात आहे.

परंतु आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना राज्यमंत्रीपद देत ताकद देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून होण्याची दाट शक्यता आहे. (Abdul Sattar) सत्तार, भुमरेंपैकी कुणाचे मंत्रीपद जाण्याची शक्यता नसली तरी जिल्ह्याला शिरसाट यांच्या रुपाने शिवसेनेचा तिसरा मंत्री मिळू शकतो.

सध्या संदीपान भुमरे हे रोजगार हमी व फलोत्पादन, तर अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री म्हणून कार्यरत आहेत. भुमरे यांच्याकडे तर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे, मात्र या दोन्ही मंत्र्यांचा शिंदेंची शिवसेना (Shivsena) वाढवण्यासाठी गेल्या वर्षभरात काहीही उपयोग झालेला नाही. भुमरे यांनी आपला पैठण विधानसभा मतदारसंघ मजबुत करण्यासाठी तर सत्तार यांनी अधिकाधिक प्रकल्प आणि निधी आपल्या मतदारसंघात कसे आणता येतील? यासाठीच सगळी शक्ती खर्च केली.

ते राज्याचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री असल्यामुळे पक्ष, संघटना मजबुत करणे ही देखील आपली जबाबदारी आहे याचा विसर या दोन्ही मंत्र्यांना पडला आहे. अब्दुल सत्तार हे तर काॅंग्रेसमधून केवळ मंत्रीपदासाठी शिवसेनेत दाखल झाले होते, परंतु भुमरे हे मुळचे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनचे शिवसैनिक. पण त्यांनी देखील आपल्या दोनवेळच्या मंत्रीपदाच्या काळात मतदारसंघ सोडला तर जिल्हा, मराठवाड्यात संघटना वाढीसाठी फार प्रयत्न केल्याचे दिसून आलेले नाही.

या उलट शिवसेनेत बंड झाले त्या दिवसापासून संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांना अंगावर घेतले. आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत या सगळ्या नेत्यांवर ते तुटून पडले. त्यांच्या या आक्रमकतेमुळेच शिंदेंनी त्यांच्यावर राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली. सुरुवातीला केसरकरांशी त्यांचा वाद झाला असला तरी पक्षाची भूमिका ते राज्य पातळीवर नेटाने मांडतांना दिसत आहेत.

पहिल्या मंत्रीमंडळात भुमरे-सत्तार शिरसाटांवर भारी पडले होते. मुख्यमंत्र्यांची अडचण पाहून शिरसाटांनी देखील पुढच्यावेळचा शब्द घेत संयम दाखवला होता. आता त्यांच्या सयंमाची परीक्षा देखील संपली आहे. त्यामुळे दोन दिवसांनी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात शिरसाट शपथ घेतांना दिसले तर नवल वाटायला नको. संजय शिरसाट यांचा शहरातील तीन्ही मतदारसंघात चांगला संपर्क आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेत आपली ताकदही सिद्ध केली आहे.

आगामी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेतल्या, तर सत्तार, भुमरे यांच्यापेक्षाही शिरसाट फायदेशीर ठरू शकतात. शिवाय जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवायची असले तर शिरसाटांना बळ देण्याशिवाय पर्याय नाही, असेही चित्र आहे. दिवाळीनंतर महापालिका आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी शिरसाटांना मंत्रीपद देवून त्यांची नाराजी दूर करण्याचा आणि त्यांना संघटनावाढीच्या कामाला जुंपण्याचा शिंदे निश्चित प्रयत्न करतील, असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT