Vilasrao Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Vilasrao Deshmukh News : विलासराव देशमुखांच्या अभ्यासपूर्ण,खुमासदार शैलीतील गाजलेल्या भाषणांचा ठेवा पुन्हा उलगडणार

Congress Political News : विलासराव देशमुख यांची विधिमंडळातील भाषणे म्हणजे अभ्यासपूर्ण ठेवा आहे.

सरकारनामा ब्यूरो

सुशांत सांगवे

Latur : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची विधिमंडळातील भाषणे ही एक मेजवानी असायची. कुठल्याही विषयाचा खोलवर अभ्यास आणि त्याच्या जोडीला खुमासदार शैली यामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली. ही मेजवानी पुन्हा एकदा महाराष्ट्राला अनुभवायला मिळणार आहे, पुस्तकरूपाने. त्यांच्या गाजलेल्या भाषणांचे हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज ११ वा स्मृतिदिन. यानिमित्ताने बाभळगाव येथील विलासबागेत (स्मृतिस्थळ) राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी विलासराव देशमुख यांचे मित्र, माजी आमदार उल्हास पवार यांनीही आदरांजली अर्पण करून आपल्या भावना 'सरकारनामा'कडे व्यक्त केल्या.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ हे विलासराव देशमुख यांच्या गाजलेल्या भाषणांचे पुस्तक तयार करत आहे. त्यांनी नेमलेल्या समितीचे उल्हास पवार(Ulhas Pawar) हे अध्यक्ष तथा संपादक आहेत. या पुस्तकाबद्दल बोलताना ते म्हणाले, विलासराव देशमुख यांची विधिमंडळातील भाषणे म्हणजे अभ्यासपूर्ण ठेवा आहे. तो जतन व्हावा, लोकांसमोर यावा म्हणून हे पुस्तक तयार होत आहे.

या पुस्तकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी प्रस्तावना लिहिली असून हे पुस्तक ७०० पानांचे झाले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे याचे प्रकाशन वेळेवर झाले नाही पण, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी हे पुस्तक प्रकाशित व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

विलासराव देशमुख यांचे भाषण सुरू झाले की सभागृह ओतप्रोत भरलेले असलेले असायचे. टीकेला उत्तर देताना ते शैलीदार शब्द वापरत, विनोद करीत. पण, समोरच्याला ते कधीच दुखवत नसत. त्यांचे रटाळ, नीरस भाषण कोणाला शोधून सापडणार नाही. हे पुस्तक तयार करताना त्यांच्या अनेक भाषणांचा अभ्यास करावा लागला.

वास्तविक, ही आमच्यासाठी तारेवरची कसरतच होती. कारण त्यांची गाजलेली भाषणे असंख्य आहेत. यातील निवडक आणि वेगवेगळ्या विषयांवरील भाषणे आम्ही या पुस्तकात घेतली आहेत, असे उल्हास पवार यांनी सांगितले.

विलासराव देशमुख यांची आठवण झाली नाही, असा एकही दिवस जात नाही, असे सांगताना उल्हास पवार यांचा कंठ दाटून आला होता. आज लातूरला येण्याआधी मी पंढरपूर येथे गेलो होतो. दर्शन घेवून बाहेर आल्यानंतर ५ - ६ लोक माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, तुम्हाला भेटल्यानंतर आम्हाला देशमुख यांची भेट घेतल्याचे समाधान मिळाले. आज ११ वर्षांनंतरही विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh) लोकांच्या मनात आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे, असेही उल्हास पवार यांनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT