Ajit Pawar, Eknath Shinde, Dhananjay Munde, Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : धनूभाऊंच्या परळीतील 'शासन आपल्या दारी'ला भाजपचा खोडा ?

Amol Jaybhaye

Dhananjay Munde News : राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेत एन्ट्री झाली आणि धनंजय मुंडेंना कृषिमंत्री पद भेटताच बीडला नियोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम परळीला ठरला. साधारण २० तारखेपर्यंत हा कार्यक्रम होण्याबाबत तयारी सुरू असतानाच भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचल्याने कार्यक्रमावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. अद्यापही कार्यक्रमाची तारीख ठरली नाही. आता कार्यक्रम रद्द होतो का, हे पाहावे लागेल.

कार्यक्रमावरील राष्ट्रवादीचा पगडा आणि कार्यक्रमाच्या नावाखाली होणारी अवाजवी उधळपट्टी यामुळे जनमाणसांत सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील भाजप (BJP) आमदारांसह प्रमुख नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानी घालत 'कार्यक्रमच नको' असा सूर आवळला आहे.

राज्यात गेल्या वर्षी सत्ता बदलानंतर शासनाचा बहुचर्चित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम अनेक जिल्ह्यांत झाला. बीडमध्येही कार्यक्रम व्हावा, यासाठी त्यावेळी शिवसेना आग्रही होती. त्याच काळात सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) एन्ट्री झाली. त्यामुळे जुलै महिन्यात नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. पुढेही त्याची तारीख बदलून आता सप्टेंबरअखेरीस कार्यक्रमाची तयारी सुरू झाली.

मात्र, बीडला होणारा कार्यक्रम परळीला निश्चित झाला आणि १९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रशासन पातळीवर तयारींच्या बैठकांचा सिलसिलाही सुरू झाला. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी तीन दिवसांचा मंडप उभारण्यासाठी तब्बल दोन कोटी २१ लाख ९० हजार रुपयांच्या खर्चाची निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत मागविल्या.

शासन स्तरावरील सूचनेवरून इकडे प्रशासनाची तयारी सुरू असतानाच भाजप आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यात आता 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमच नको असा सूर आवळला. कार्यक्रमावरील अवाजवी खर्चामुळे जनमाणसात सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा पुढे करत हा कार्यक्रम कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे होमपिच परळीत असल्याने कार्यक्रमावर राष्ट्रवादीचा पगडा असेल, अशी कैफियतही मांडली. या तक्रारींचा परिणाम जाणवत असून, सध्यातरी कार्यक्रमाबाबत सामसूमच आहे. अद्यापही कार्यक्रमाची तारीख निश्चित झालेली नसल्याने संभाव्य 'शासन आपल्या दारी'वर अनिश्चिततेचे ढग दिसत आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT