Shikrapur News : संपूर्ण राज्यभर नावाजलेल्या वाबळेवाडी शाळेमधील अनियमिततेच्या बाबतीत अखेर तत्कालीन मुख्याध्यापक व वाबळेवाडी पॅटर्नचे जनक दत्तात्रय वारे यांना अखेर पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले आहे. त्यांच्यावर झालेले कुठलेच आरोप सिद्ध न झाल्याचा स्पष्ट अहवाल विभागीय चौकशी समितीने पुणे (Pune) जिल्हा परिषदेला सादर केल्यानंतर सीईओ रमेश चव्हाण यांनी वरील आदेश दिले आहेत.
दरम्यान, सदर प्रकरण विधानसभेतही अनेकवेळा उपस्थित केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: खुलासा करून सदर प्रकरण अधिक लांबणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शाळा प्रकरणावर पडदा पडला असे म्हणता येणार आहे. काचेची शाळा, क्रमिक अभ्यासक्रमाशिवाय इतर १६ वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन आणि थेट स्विडनच्या गोटलॅंड व एम. जी. स्कूल या दोन शाळांशी सामंजस्य करार करून आंतरराष्ट्रीय शाळा दर्जा मिळविलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत एका शाळाबाह्य व्यक्तीकडून फी घेतल्याचे तोंडी आरोप (१४ जुलै २०२१) झाले व त्याबाबत तीन महिला जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेत गदारोळ (२२ नोव्हेंबर २०२१) केल्यावर तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी निलंबन (२२ नोव्हेंबर २०२१) करून त्यांची विभागीय चौकशी लावली.
गंमत म्हणजे तोंडी तक्रारीनुसार चौकशी सुरू केल्याचा गंभीर प्रकारही वाबळेवाडी शाळेच्या नशिबी आले आणि त्याच व्यक्तीचा लेखी आरोप जिल्हा परिषदेकडे १५ दिवसांनी (२९ जुलै २०२१) दाखल करून घेण्यात आला. दरम्यान, वारे यांना तालुका बदलून खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा दिली असता, तिथेही वारे यांनी ३ एवढा विद्यार्थी पट मुख्याध्यापक संदीप म्हसुडगे यांच्या सोबतीने १०० पर्यंत घेऊन जात शाळेला या वर्षीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषकही मिळवून दिला.
तब्बल दोन वर्षे विभागीय चौकशी चालू राहिल्याने हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यापर्यंत तर गेलेच शिवाय माजी मंत्री बच्चू कडू यांनीही याबाबत सरकारला वारंवार जाब विचारले. अखेर विभागीय चौकशी समितीने या संपूर्ण चौकशीत वारे यांचेवर झालेले हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर व प्रशासकीय कामात निष्काळजीपणासह संपूर्ण आरोप सिद्ध होत नसल्याचे लेखी कळविले व नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे यांना वरील सर्व आरोपांतून दोषमुक्त करीत निलंबन कालावधी सेवाकाळ गृहीत धरत असल्याचा आदेश नुकताच जारी करून तो वारे यांना समक्ष जालिंदरनगर येथे देण्यात आला आहे.
अनवाणी प्रवास संपेल वाबळेवाडीकरांच्या साक्षीने
अनियमिततेचे आरोप, चौकशी, निलंबन आणि पदोपदी बदनामीला सामोरे गेलेल्या वारे यांनी निलंबन होताच पायात चप्पल घालणे सोडून दिले. हा त्यांचा त्याग वाबळेवाडीकरांनाही सहन होत नव्हता. मात्र, दोषमुक्त होताच चप्पल घालण्याचा त्यांचा निर्णय आता त्यांनी वाबळेवाडीकरांच्यावर सोपविला असल्याची माहिती माजी सरपंच केशवराव वाबळे, सतीश वाबळे व सतीश कोठावळे यांनी दिली.
प्रशासकीय त्रुटीचा असा घटनाक्रम
१४ जुलै २०२१ - तोंडी तक्रार असल्याचे सांगत बीडीओंची शाळेत येऊन वारेंची चौकशी.
१६ जुलै २०२१ - शाळेची दफ्तरतपासणी न करता गंभीर अनियमिततेचा अहवाल बीडीओंकडून जिल्हा परिषदेला सादर.
२७ जुलै २०२१ - जिल्हा परिषद चौकशी समितीची स्थापना.
२९ जुलै २०२१ - शाळाबाह्य व्यक्तीचा तक्रार अर्ज पुणे जिल्हा परिषदेकडे दाखल.
९ सप्टेंबर २०२१ - चौकशी पूर्ण करून अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर.
२२ नोव्हेंबर २०२१ - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिरूरच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांचा वारेंच्या विरोधात गदारोळ.
२२ नोव्हेंबर २०२१ - चौकशी पूर्ण होऊनही तत्कालीन सीईओ आयुष प्रसाद यांनी चौकशीत हस्तक्षेप होऊ नये म्हणून वारे यांचे निलंबन केले होते.
१ फेब्रुवारी २०२२ - जालिंदरनगर येथील शाळेत नियुक्ती.
५ सप्टेंबर २०२३ - लोकसहभागातूनच जालिंदरनगर येथे १०० विद्यार्थी पटाच्या शाळेच्या उभारणीने पुणे जिल्हा परिषदेकडून अध्यक्ष चषक जाहीर.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.