Dharashiv Political News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ (अजित पवार गट) आता शिवसेनेनेही (शिंदे गट) या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते, आता शिंदे गटात असलेले माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर हे उद्धव ठाकरे गटात आहेत. महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीत या जागेबाबत अद्याप काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) दावा केलेला नाही. काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी मध्यंतरी कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, नंतर हालचाली थंडावल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही शांतच आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रा. सुरेश बिराजदार हे तर कामाला लागल्याचेच दिसत आहे. त्यांना अजितदादा पवार यांनी तसे आदेशच दिल्याचे सांगितले जात आहे. त्यात महायुतीतील शिंदे गटानेही उडी घेतली आहे.
रवी सर या नावाने लोकप्रिय असलेले प्रा. रवींद्र गायकवाड हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते डाॅ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी प्रा. गायकवाड यांनी उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा (१९९५ आणि २००४) प्रतिनिधित्व केले.
कुशल संघटक, प्रभावी वक्ते आणि सहज उपलब्घ होणारा नेता अशी त्यांची ओळख होती. मात्र, खासदारकीच्या शेवटच्या टप्प्यात पक्षांतर्गत घडामोडींमुळे ते काही काळ जणू अज्ञातवासात गेले होते. त्यावेळी विद्यमान पालकमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांचा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला होता. प्रा. गायकवाड यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी सावंत यांच्यावर मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवली होती. विशेष म्हणजे त्याच सावंतांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रा. गायकवाड हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू होते. विविध कारणांवरून प्रा. गायकवाड यांना शिवसेनेतून दोन वेळा बाहेर काढण्यात आले. दोन्ही वेळा त्यांना परत घेण्यात आले. दोन वेळा बाहेर काढून नंतर शिवसेनेत प्रवेश मिळवणारे प्रा. गायकवाड हे एकमेव असावेत. उद्धव ठाकरे यांनी २००५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून केशव ऊर्फ बाबा पाटील यांना उमेदवारी दिली होती.
बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रा. गायकवाड यांना ऐनवेळी पुन्हा उमेदवारी देण्यात आली. दोन मराठा आणि एक लिंगायत उमेदवार असला की उमरगा मतदारसंघातून मराठा उमेदवाराचा पराभव निश्चित मानला जायचा. मात्र, २००५ मध्ये प्रा. गायकवाड यांनी हे गृहितक मोडीत काढून विजय मिळवला. त्यावेळी काँग्रेसकडून बसवराज पाटील, शिवसेनेकडून प्रा. गायकवाड रिंगणात होते. शिवसेनेने तिकीट कापल्यामुळे बाबा पाटील यांनी बंडखोरी केली होती. प्रा. गायकवाड यांनी खासदार असताना विमानातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते.
प्रा. गायकवाड यांनी सुरुवातीच्या काळात शेजारच्या लातूर, सोलापूर जिल्ह्यांसह लगतच्या कर्नाटकच्या भागातही शिवसेनेची संघटनात्मक बांधणी केली होती. ते आमदार असताना 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार होते. मात्र, त्यांना मंत्रिपद किंवा अन्य कोणतेही लाभाचे पद मिळाले नाही. त्यांच्या खासदारकीच्या काळात शिवसेना केंद्रात सत्तेत सहभागी होती, त्यावेळीही त्यांना काही मिळाले नव्हते. प्रचंड क्षमतेच्या, पण महत्त्वाकांक्षा नसलेल्या या नेत्याची पदांच्या बाबतीत शिवसेना नेतृत्वाने कायम उपेक्षा केली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रा. गायकवाड यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळेपासून प्रा. गायकवाड नाराज होते. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रा. गायकवाड यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि सोबत राहण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ठाकरे यांनी त्यांना पक्षातील महत्त्वाचे पद दिले गेले नाही.
मातोश्रीवर कुणाला प्रवेश द्यायचा हे ठरविणारी मंडळी अद्यापही कायम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे प्रा. गायकवाड यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुंबईच्या चकरा वाढल्या आहेत. धाराशिव मतदारसंघ आपल्याकडे घेऊन प्रा. गायकवाड यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सुरू केला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.