Hingoli : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आले. आधी डबल इंजिन म्हटले गेलेले सरकार अजित पवारांच्या सहभागामुळे ट्रिपल इंजिन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सातत्याने राज्यातील महायुती सरकारच्या काळातील विकासकामांचा दाखल देत महाराष्ट्राला देशात अव्वल करणार असल्याच्या दावा केला जात आहे. पण आता ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जर गद्दारांनी घात केला नसता तर आपल्या महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगात अव्वल केले असते अशी खंत व्यक्त करतानाच शिंदे गटावर टीकेची तोफ डागली आहे.
माजी मुख्यमंत्री शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची रविवारी हिंगोलीत निर्धार सभा झाली. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर घणाघात करतानाच भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री असताना दोन अड़ीच वर्षांचे माझं काम तुमच्यासमोर आहे. पण दुर्दैव असे की, या गद्दारांनी घात केला नसता तर आपला महाराष्ट्र मी देशातच नव्हे तर जगात अव्वल केला असता असेही ते म्हणाले.
राज्यात 'ट्रिपल' इंजिन सरकार असा टेंभा मिरवला जात आहे. नुसत्याच थापा मारल्या जात आहेत. सरकार आपल्या दारी आणि योजना मात्र कागदावरी. सरकार आपल्या दारी आणि थापा मारतंय लय भारी. हे सरकार नुसतं थापा मारतंय असेही ठाकरे म्हणाले.
'' तुमच्या दिल्लीतील वडिलांकडे मते मागायची... ?''
डबल इंजिन सरकार आणि आता त्यात अजितदादां(Ajit Pawar) चा एक डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत? मालगाडी होतेय यांची. तुमच्या पक्षात कर्तृत्व नाही? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात, पक्ष फोडला, पक्ष सोडला, वडील माझे वापरायचे. का तुमच्या दिल्लीतील वडिलांकडे मते मागायची हिंमत राहिली नाही? चोरणार माझे वडील, इतर पक्षातील नेते चोरणार आणि म्हणणार आम्ही हिंदू आहोत. अरे कसले हिंदू, याला नामर्द म्हणतात. ही नामर्दांगी आहे, असा घणाघातही ठाकरेंनी यावेळी केला.
'' ...म्हणून फडणवीसांवर बोलणंच सोडून दिलंय ! ''
आता मी देवेंद्र फडणवीसांवर बोलणंच सोडून दिलं आहे. कारण मी काहीही बोललो तरी त्याचा बोभाटा होतो. मी अगोदर त्यांना फडतूस बोललो होतो आता पण आता बोलणार नाही. मी त्यांना कलंकही म्हटलं होतं पण आता नाही म्हणणार. आता त्यांना थापाड्या म्हणणार होतो. पण आता नाही म्हणणार. कारण मी काहीही बोललो तरी त्याचा बोभाटा होतो. अरे टरबुजाच्या झाडालाही पाणी लागते, असा खोचक टोला उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
'' मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदू मानायचं का?''
उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांचा देखील हिंगोलीतील सभेत खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,अनेक जण गद्दार झाले, मात्र हिंगोलीतील जनता शिवसेना आणि भगव्याचे मागे राहिले. आता सुद्धा काही गद्दार असून, बेडकुल्या दाखवत आहे. पण या बेडकुल्यांमध्ये हवा आहे. ज्या गद्दाराला आपण नाग समजून त्याची पूजा केली. पण तो फणा उलट्या फिरवून डसायला लागला. त्यामुळे पायाखाली साप आल्यास त्याला काय करायचं हे तुम्हाला कळतं. अरे बाबा तुला पुंगी वाजवली, तुला दूध पाजलं, सगळं वाया गेलं. नाव हिंदुत्वाचं, पण धंदे मटक्याचे. असे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का? हा माझा प्रश्न आहे. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदू मानायचं का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.