Nashik Politics : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विद्येची देवता सरस्वती व ब्राह्मण समाजाविरोधात वक्तव्य केल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरुन हटवण्यासाठी ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवे यांनी थेट मंत्री भुजबळांनाच आव्हान दिले.
ते म्हणाले, ब्राह्मण द्वेशाची लाट पसरवून आम्हाला ‘नथूराम’ व्हायला भाग पाडू नका! सामाजिक परिस्थितीतून नथुराम तयार होतो. ब्राह्मण समाजाची विभत्सना करुन तुम्ही आम्हाला आक्रमक स्वरुप धारण करायला लावू नका, असे थेट आव्हान देत त्यांनी मंत्री भुजबळांना हटवण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे बुधवारी (ता.२३) नाशिकमध्ये भुजबळांच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली. यावेळी ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ते म्हणाले, ब्राह्मण व मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र मंत्री भुजबळांनी आखले आहे. बेताल वक्तव्य करणार्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. येत्या आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्रिमंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.
भुजबळांना मंत्रिमंडळातूनच नव्हे तर राजकारणातून हद्दपार करण्यासाठी वेळ पडली तर विरोधात मतदान करु. त्यांच्या येवला मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे बोगस मतदार यादीतून बाहेर काढण्यासाठी आपण यापुढे लढा देणार असल्याची ग्वाही यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे नाशिकचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी दिली. कायदेशीर मार्गाने छगन भुजबळांना माफी मागायला लावण्याचा मार्गही या सभेत अनेकांनी बोलून दाखवला. पण कायदेशीर लढाईत वेळ आणि श्रम वाया घालवण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना भेटून भुजबळांना मंत्रिपदवरुन हटवण्याचे प्रयत्न करण्याचा निर्णय ब्राह्मण समाजाने या बैठकीत घेतला.
ब्राह्मण सून चालते, पण समाज नाही...
मंत्री भुजबळांना ब्राह्मण समाजाविषयी प्रचंड द्वेश असल्यामुळे ते वारंवार आमच्या समाजाचा अवमान करतात. पण तुम्हाला ब्राह्मण समाजची सून चालते; मग समाजाचा इतका द्वेश कशासाठी, असाही प्रश्न या बैठकीत उपस्थित झाला. तुमच्या मुलांची नावे तुम्ही शिवाजी, संभाजी किंवा जोतिबा, अशी का ठेवली नाहीत. तुम्ही आताही मुलांची नावे ठेवू शकता, हवे तर बारशाला आम्ही येवू, अशा शब्दात त्यांनी भुजबळांना टोमणा मारला. सभेनंतर ब्राह्मण महासंघातर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.