former MLA Vinayakrao Patil Sarkarnama
मराठवाडा

Latur Politics : विलासराव देशमुखांच्या विश्वासू माजी मंत्र्यासमोर काँग्रेस की' बीआरएस'चा पेच ?

Congress News : तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विनायकराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते.

सरकारनामा ब्यूरो

Latur News : पक्षांतर्गत अडचण, इच्छुकांची मोठी यादी तर विरोधकांची पक्षासोबतच्या मैत्रीमुळे राजकीय भविष्य धुसर होऊ लागल्याने माजीमंत्री विनायकराव पाटील यांची सध्या भाजपमध्ये मोठी अडचण झाली आहे. ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला ते सध्या भाजपसोबत आले आहेत. तर ज्यांच्या बंडखोरीमुळे २०१९ च्या निवडणुकीत मतांचे विभाजन होऊन पराभव झाला. त्यांना भाजपने जिल्हाध्यक्ष पद दिले. त्यामुळे पाटील यांच्या पुढे कॉंग्रेस की भारत राष्ट्र समिती या पर्यायांची चाचपणी करावी लागणार आहे. पाटील काय निर्णय घेतात, यावर अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आमदारकी ठरणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पाठबळावर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत विनायकराव पाटील यांनी अहमदपूर मतदारसंघात अपक्ष आमदारकी मिळवली होती. मात्र, युती ऐवजी आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विनायकराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते. २००४ व २००९ च्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडणूक लढली पण त्यावेळी आमदारकी हुकली.

त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अपक्ष म्हणून आमदारकी मिळवली. मात्र, पुढे २०१९ ला मोठ्या बंडाळी आणि विरोधानंतर विनायकराव पाटील यांनी भाजपचे (BJP) तिकीट मिळवले. मात्र, सध्या जिल्हाध्यपद मिळवलेले दिलीपराव देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढल्याने मतांचे विभाजन होऊन पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) विद्यमान आमदार बाबासाहेब पाटालांनी विनायकराव पाटील यांचा पराभव केला होता. आता ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटांसोबत आहेत. तर भाजपमध्ये भारत चामे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख, गणेश हाके असे एकापेक्षा एक ताकदवान मंडळी आमदारकीला इच्छुक आहेत.

एकीकडे पक्षांतर्गत विरोध, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आव्हान त्यामुळे विनायकराव पाटील सध्यातरी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. तरी कार्यकर्त्यांकरवी विविध पर्यांयांची चाचपणी सुरू आहे. तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेकर राव यांचा 'बीआरएस'सध्या महाराष्ट्रात शिरकाव करत आहे. त्याला येथील जनतेचा कसा पाठींबा मिळतो, तो पर्याय कसा ठरेल, या विचार माजी आमदार करत असावेत, असे मानायला हवे. कारण त्यांच्या जवळचे म्हणून ओळख असलेले दयानंद मोरे, वसंत शेटकर यांनी नुकताच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.

तर मुळ कॉंग्रेस पक्षाच्या विविध बैठकांनाही त्यांचे कार्यकर्ते उपस्थिती लावत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची जिल्ह्यात अनेक वर्षे ओळख होती. विधानसभेची निवडणूक अद्याप दृष्टीक्षेपात नसली तर गेल्या काही महिन्यातील राज्यस्तरावरील राजकारणामुळे प्रत्येक मतदारसंघात प्रमुख नेत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हे ओळखूनच सध्या विविध पर्याय आजमावून पाहिले जात आहे. या संभ्रमाचाच फायदा सिमावर्तीय मतदारसंघात 'बीआरएस'ला (BRS) होईल, असे विश्लेषकांचे मत आहे. माजी आमदारासह कोण-कोण 'बीआरएस'ला पसंती देतात, की नव्याने उभारी घेऊ पाहणाऱ्या कॉंग्रेसकडे नेत्यांचा कल वाढतो हे येणाऱ्या काळात कळेल.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT