Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अधक्ष शरद पवार यांची येत्या २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. त्या सभेला छत्रपती शाहू महाराज येणार असून सभेच्या अध्यक्षस्थानी ते असणार आहेत. खुद्द शाहू महाराजांनी त्याला दुजोरा दिला आहे. दरम्यान ‘खासदार व्हावं, अशी माझी पूर्वी इच्छा होती,’ असेही शाहू महाराजांनी या वेळी सांगितले. (Shahu Maharaj will be the president of Sharad Pawar's meeting in Kolhapur)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानाबाबत छत्रपती शाहू महाराजांनी भाष्य केले. ते म्हणाले की, पवार यांच्या सभेला मी उपस्थित असणारच आहे. महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार मी आहे, ही बातमी कुठून आली, हे मला माहिती नाही. मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहे, असं कोण म्हणतंय. त्यांनाच माझ्या उमेदवारीबाबत विचारा. पण, खासदार व्हावं, अशी माझी पूर्वी इच्छा होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार का, अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३० ते ३५ आमदार पक्ष सोडून गेले आहेत. भाजपसोबत येण्यासाठी अजित पवार गटाकडून शरद पवार यांना अनेकदा गळ घालण्यात आलेला आहे. मात्र, त्याला पवारांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यानंतर शरद पवार गट राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहे.
शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये जाहीर सभा झाली. त्या सभेत त्यांनी बंडखोरांना अप्रत्यक्ष इशारा दिलेला आहे. बीडनंतर पवारांची पुढची सभा ही जळगावमध्ये होणार आहे. त्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे होणार आहे. त्यानंतर पवारांची पुढची सभा कोल्हापुरात दसरा चौकात होणार आहे. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.