Omraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar : त्यांच्या मांडीला मांडी लावून नाही, तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार, त्यासाठीच हा निर्णय : ओमराजेंचा राणा पाटलांविरोधात नव्याने एल्गार

Dharashiv Shivsena News : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Vijaykumar Dudhale

Darashiv, 21 June : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करायचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशाचा निर्धार बोलून दाखवला आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे, अशा शब्दांत खासदार निंबाळकर यांनी नाव न घेता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधात नव्याने एल्गार पुकारला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज (ता. २१ जून) त्यांच्या गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार ओमराजेंनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला आहे. त्याबाबतचा निर्णय ते लवकरच जाहीर करणार आहेत. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी तयारीला लागा आणि पाठीशी उभे राहत साथ द्या, असे आवाहन केले आहे.

ओमराजे निंबाळकर म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका मोठ्या जोमाने लढवल्या. मात्र त्यात यश आले नाही. आर्थिक आणि सत्तेची ताकत त्यांच्यासोबत (राणा पाटील) आहे. काँग्रेस सरकार असतानाही ते तिथे होते, भाजप सरकार आले की तिथेच त्याचं चालूच आहे. कमी साधनसामग्रीत आपण कुठेपर्यंत लढायचं. आपणसुद्धा त्याच मार्गानं गेलं पाहिजे, असे मला वाटते.

राणा पाटील यांचा परिवार सत्तेत आहे. ते स्वतः आमदार आहेत, त्यांची पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. आणि आपण वेड्यासारखं बघत राहायचे. आपणसुद्धा सत्तेतील नेतृत्व स्वीकारले पाहिजे. भाजप शिवसेनेसह 4 पक्ष चालवत आहेत, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पवनराजे निंबाळकर यांच्या खूनप्रकरणी २० वर्षांनंतरही कोणीच आरोपी नाहीत, सगळेच निर्दोष तर मग खून कोणी केला. खासदार असूनही मी माझ्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही, तर इतरांचे काय?

अनेकजण बोलत आहेत की, तुमची प्रतिमा व नाव महाराष्ट्रात आहे. मी काय प्रतिमा सांभाळायला खासदार बनलो आहे का, या लोकांना धडा शिकवण्यासाठी झालो आहे. निकाल विरोधात गेल्यावर एकनाथ शिंदे यांनी तत्काळ गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणी केली. मला पाठबळ दिले. निकाल लावायसाठी मी तिकडे जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद, नगर परिषद सारखे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळीही झाले तर त्यांचीच सत्ता येईल. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. मी त्यांच्या मांडीला मांडी नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे, त्यासाठीच हा निर्णय घेत आहे.

तडजोडीची भूमिका मी कधीही घेणार नाही. त्या कुटुंबाला मतदान करा, असं मी कधीही सांगणार नाही. त्यांच्यासाठी मतंही मागणार नाही, अशी भूमिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT