Dr.Gaffar Kadri Join NCP News Sarkarnama
मराठवाडा

NCP News : तीनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले डॉ. गफार कादरी राष्ट्रवादीत!

After facing defeat in the Assembly elections thrice, Gaffar Qadri begins a fresh political chapter : औरंगाबाद पूर्व मतदार संघात तीनवेळा नशीब आजमावून पदरी अपयश आलेले गफार कादरी यांनी आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आधार शोधला आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षांतराला हळूहळू सुरुवात होत आहे. दोनवेळा एमआयएम कडून तर एकदा समाजवादी पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेले डॉ. गफार कादरी हे आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याची मोहीम हाती घेतली आहे.

ग्रामीण भागात पक्षप्रवेश सोहळे सुरू असतानाच आता शहरामध्ये गफार कादरी यांना पक्षात प्रवेश देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. दहा वर्ष एमआयएममध्ये काम केलेल्या गफार कादरी यांनी 2014 आणि त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली होती. परंतु ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी एमआयएमला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.

औरंगाबाद पूर्व मतदार संघात तीनवेळा नशीब आजमावून पदरी अपयश आलेले गफार कादरी यांनी आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आधार शोधला आहे. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीलाही चांगल्या अल्पसंख्यांक चेहऱ्याची गरज होती. शैक्षणिक संस्था आणि मुस्लिम समाजामध्ये दांडगा जनसंपर्क असलेल्या कादरी यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) हे संभाजीनगरात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होत आहे.

गफार कादरी यांच्या प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती फायदा होतो? हे लवकरच स्पष्ट होईल. गफार कादरी हे एमआयएममध्ये असताना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. परंतु इम्तियाज जलील यांच्याशी असलेल्या संघर्षातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम ठोकला होता. 2014 च्या निवडणुकीत 90000 तर 2019 मध्ये 60000 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या गफार कादरी यांची एमआयएम सोडल्यानंतर मात्र 2024 च्या निवडणुकीत दयनीय अवस्था झाली.

विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी आपला मध्य मतदारसंघ सोडून पूर्व मधून मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. अवघ्या 1700 मतांनी अतुल सावे विजयी झाले. एमआयएम आणि महायुतीचे अतुल सावे यांच्यात काटे की टक्कर झाली, मात्र यात गफार कादरी आपले डिपॉझिट गमावून बसले. कादरी यांना अवघ्या सहा हजार मतांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीपासून फारसे कुठे न दिसणारे कादरी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करत आहेत.

या प्रवेशाने कादरी यांना आणि त्यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला किती फायदा होतो? हे आगामी महापालिका निवडणुकीतच स्पष्ट होईल. इम्तियाज जलील यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या गफार कादरी यांनी पक्ष सोडताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत झालेली युती विधानसभेला इम्तियाज जलील यांच्यामुळे तुटली. आपल्या पराभवालाही तेच जबाबदार होते असे, म्हणत कादरी यांनी आपल्या पक्ष सोडण्यालाही त्यांचे घाणेरडे राजकारण कारणीभूत असल्याचा हल्लाबोल केला होता.

लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाला अपयश आले. त्यातून सावरत पक्ष आता महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून यावेळी ग्रामीण भागातही एमआयएम नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे. अशावेळी गफार कादरी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश पक्षाला किती फायद्याचा ठरतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT