AIMIM News : स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 आॅगस्ट रोजी राज्यातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकांनी दिले आहेत. यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत, तर कोणी काय खावे? काय खावू नये हे सरकारने ठरवू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारचा हा तुघलकी निर्णय असल्याचे म्हणत एमआयएमने चिकन, बिर्याणी, मटन, कोरमा पार्टीचे आयोजन केले आहे.
या पार्टीचे निमंत्रण राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना देखील देण्यात आले आहे. इम्तियाज जलील यांनी या संदर्भात आपल्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट व्हायरल करत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. एवढेच नाही तर उद्या दुपारी एक वाजता आपल्या निवासस्थानी चिकन, मटन पार्टीसाठी या असे म्हणत महापालिका आयुक्त आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना डिवचले आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, मालेगाव, नागपूर, अमरावती यांसह राज्यातील काही महापालिकांनी जारी केले आहेत. (Imtiaz Jaleel) या निर्णयावरून राज्यात वादाला तोंड फुटले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून या आदेशाचे स्वागत होत असताना, खाटीक समाज आणि मांसाहार करणाऱ्या नागरिकांकडून तसेच विरोधी पक्षांकडून याचा विरोध होत आहे.
या निर्णयानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 15 ऑगस्टला मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा हा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला निर्णय नाही, तर 1988 रोजी तत्कालीन सरकारच्या काळात घेतलेला असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. यावरून पुन्हा नव्या वादाला सुरूवात झालेली असताना यात एमआयएमने देखील उडी घेतली आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी स्वतःचा फोटो आपल्या फेसबुकपेजवरून पोस्ट करत महापालिका आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना आपल्या घरी पार्टीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता माझ्या निवासस्थानी होणाऱ्या चिकन बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीत सहभागी होण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी सर्व मांस आणि चिकन दुकाने बंद करण्याचा तुघलकी आदेश जारी करणाऱ्या सर्व महानगरपालिका आयुक्तांना आमंत्रण.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. (भारत हा एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे आणि महाराष्ट्र हे हुकूमशहा शासित राज्य नाही). ज्यांना अद्याप स्वातंत्र्याचा अर्थ समजलेला नाही त्यांना आठवण करून देण्यासाठी ही पार्टी आयोजित केली जात आहे, अशा शब्दात एमआयएमने महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.