Beed fake paneer case Sarkarnama
मराठवाडा

Beed fake paneer case : तुकाराम मुंढेंना भेसळखोर बधेनात! खवा अन् पनीरमध्ये घातक सॅफोलाइट केमिकलचा वापर; भेसळीचा बीड पॅटर्न राज्यात चर्चेत

Industrial chemical found paneer and khoya Beed FDA intensifies crackdown under Tukaram Mundhe across Maharashtra : बीड जिल्ह्यातील भेसळखोरांनी दुग्धजन्य पदार्थात खवा, पनीरमध्ये थेट मानवी शरीरास सॅफोलाइटचा वापरल्याचे आढळले आहे. यामुळे मराठवड्यातील बीडमधील भेसळखोराचा पॅटर्न आता राज्यात चर्चेत आला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra food adulteration news : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यापासून राज्यभरातील भेसळ, तेल आणि गुटखा माफियांविरोधातील कारवाईने मोठा वेग घेतला आहे.

त्यांच्या आक्रमक कारवाईमुळे राज्यातील अन्न नमुना तपासणीत तब्बल 467 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, इतक्या कठोर मोहिमेनंतरही भेसळखोरांनी हार मानलेली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मराठवाड्यातील बीड (Beed) जिल्ह्यातील भेसळखोरांनी दुग्धजन्य पदार्थांमध्ये थेट औद्योगिक रसायनांचा वापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. खवा आणि पनीरसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या ‘सॅफोलाइट’ या रसायनाची भेसळ केल्याचे तपासात समोर आले आहे.

तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरातील भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अन्न व औषध प्रशासनाचे पथक कुठेही पोहोचले की “तुकाराम मुंढे आले” अशी चर्चा बाजारात सुरू होत होती. बीडमध्येही याच धास्तीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर परिणाम झाला होता. काही काळ लग्नसमारंभांसह विविध कार्यक्रमांतून पनीर अक्षरशः गायब झाले होते, तर शुद्ध खवा आणि पनीरचे दरही अचानक वाढले होते.

मात्र काही दिवसांनंतर भेसळ माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे आता उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दहीवंडी येथे टाकलेल्या छाप्यात मोठा भेसळीचा प्रकार समोर आला. दहीवंडी येथील ‘जय श्री कृष्णा केक अँड बर्फी’ या उत्पादन केंद्रावर कारवाईदरम्यान खवा आणि पनीर अधिक चमकदार दिसावे यासाठी घातक सॅफोलाइट मिसळले जात असल्याचे तपासात आढळले.

या कारवाईत तब्बल 35 हजार 536 रुपयांचे मिल्क केक, बर्फी आणि इतर खाद्यपदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले. संबंधित व्यावसायिक कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित याच्याविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार बीडमधील शिरूर पोलिस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासणीत जप्त करण्यात आलेला मिठाई आणि कच्च्या मालाचा साठा निकृष्ट, असुरक्षित आणि भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच अयोग्य आणि अस्वच्छ साठवणुकीमुळे हा माल घटनास्थळीच खोल खड्डा करून नष्ट करण्यात आला असून संबंधित उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

काय आहे सॅफोलाइट?

सॅफोलाइट, ज्याला रासायनिक भाषेत सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सिलेट किंवा रॉन्गालाइट म्हटले जाते, हे अत्यंत शक्तिशाली औद्योगिक रसायन आहे. याचा वापर प्रामुख्याने टेक्सटाईल उद्योगात कपड्यांना रंग देण्यासाठी, छपाईसाठी आणि कापडावरील अतिरिक्त रंग काढण्यासाठी केला जातो. असे रसायन खाद्यपदार्थांमध्ये वापरल्यास ते मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. बीडमधील हा प्रकार आता राज्यातील भेसळ माफियांच्या नव्या पॅटर्नची धोकादायक घंटा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT