

Fake Medicine Racket Maharashtra : तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कारभार हाती घेतल्यापासून विभागातील मरगळ झटकली गेली असून प्रशासन आता थेट मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांत भेसळमाफिया आणि गुटखा माफियांवर धडक कारवाया करत सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या FDA ने आता बनावट औषधांचा काळाबाजार करणाऱ्या माफियांना लक्ष्य केले आहे. नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत खळबळ उडाली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बनावट आणि भेसळयुक्त औषधांच्या आंतरराज्यीय रॅकेटचा मोठा पर्दाफाश FDAने केला आहे. या कारवाईत नागपूर (Nagpur), मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबपर्यंत पसरलेली मोठी साखळी समोर आली आहे. या प्रकरणात अनेक औषध विक्रेते, वितरक आणि उत्पादक कंपन्यांचा सहभाग उघडकीस आला असून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात नागपूर विभागात प्रसिद्ध औषध कंपनीच्या नावाने बनावट ‘कायमोरल फोर्ट’ गोळ्या बाजारात विकल्या जात असल्याची माहिती FDA ला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू करत नागपूरमधील अनेक घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांकडून नमुने गोळा करून मुंबईतील (Mumbai) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
तपासणीत या औषधांमध्ये असणारे महत्त्वाचे एन्झाइम घटक ‘ट्रिप्सिन’ आणि ‘कायमोट्रिप्सिन’ यांची कार्यक्षमता निर्धारित मानकांपेक्षा अत्यंत कमी असल्याचे समोर आले. पुढील तपासात संबंधित उत्पादक कंपनीने ही औषधे त्यांच्या कारखान्यात तयारच झाली नसून ती पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले.
या तपासादरम्यान नागपूर, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील तब्बल 12 विक्रेते आणि पुरवठादारांचे आंतरराज्यीय नेटवर्क समोर आले. यात नागपुरातील मेडिसेल्स, उज्ज्वल फार्मा, नॅशनल मेडिकल अॅण्ड कॉस्मेटिक्स, सिद्धार्थ मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर, मयूर फार्मा, डिसेंट फार्मा आणि पीयूष फार्मा यांचा समावेश असल्याने औषध व्यवसाय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दुसऱ्या धक्कादायक कारवाईत FDAने ‘कामराज कॅप्सूल’ या आयुर्वेदिक उत्पादनाची तपासणी केली. या कॅप्सूलमध्ये ‘टॅडालाफिल’ आणि ‘पॅरासिटामॉल’ हे अॅलोपॅथिक घटक आढळून आले. मात्र उत्पादनाच्या लेबलवर याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. विशेष म्हणजे, टॅडालाफिल हे कामोत्तेजक औषध असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचे सेवन केल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
या प्रकरणात नागपुरातील विन्स फार्मास्युटिकल्स, उत्तर प्रदेशातील अल्टिमेट आयुर्वेद (मुजफ्फरनगर) आणि पंजाबमधील ब्रह्मानंद आयुर्वेदा (ओपीसी) प्रा. लि. यांच्याविरोधात नागपूर पोलिस दलाच्या गणेशपेठ पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAने सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे आता बनावट औषधांचा काळाबाजार करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.