Madhukarrao Chavan : जुन्या पिढीतील राजकीय नेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अण्णांचे वय 90 असले तरी त्यांच्यात उत्साहाची कोणतीही कमी नाही. 2019 च्या निवडणुकीत झालेला पराभव बाजूला सारून आता त्यांनी काँग्रेसचे दंड थोपटले आहेत. अण्णा या टोपणनावाने परिचित असलेले काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले आहेत. ते कॅबिनेटमंत्रीही राहिलेले आहेत.
मधुकरराव चव्हाण यांनी रविवारी (4 ऑगस्ट) 90 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त तुळजापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लोकांच्या आग्रहाखातर विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. शेवटी पक्ष सांगेल त्या आदेशाचे पालन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तुळजापूर मतदारसंघातून 2019 मध्ये भाजपचे राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी तुळजापूर मतदारसंघातून ते पाचवेळी विजयी झाले होते. गेल्या महिन्यात काही कामानिमित्त ते विधानभवनात दिसले होते. त्यावेळीच ते पुन्हा सक्रिय झाल्याचे जाणवले होते. धोतर आणि सदरा अशा जुन्या काळातील राजकीय नेत्यांचा पेहेराव आता दुर्मिळ झाला आहे, मात्र अण्णांनी तो अजूनही जपला आहे. पांढरे शुभ्र धोतर, त्यावर नेहरू सदरा, असा त्यांचा पेहेराव असतो.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुनील चव्हाण हे तुळजाभावनी सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळतात. अडचणीत असलेल्या या कारखान्याला महायुती सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात भुवया उंचावलल्या होत्या.
मधुकरराव तव्हाण हेही भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी अफवा त्यावेळी पसरली होती. त्याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यामुळे शंका बळावली होती. चव्हाण यांनी त्या अफवांचे खंडन केले होते. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारात ते सक्रिय झाले होते. चव्हाण यांच्या अणदूर गावातून राजेनिंबाळकर यांना मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या चर्चा थांबल्या होत्या.
तुळजापूर मतदारसंघातून मधुकरराव चव्हाण (Madhukarrao Chavan) हे 1999 ते 2014 दरम्यान सलग चारवेळा निवडून आले. 1990 ते 1995 दरम्यानही ते आमदार होते. शेतकरी कामगार पक्षाचे माणिकराव खपले यांनी 1995 मध्ये त्यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी एकदा चव्हाण यांनी उस्मानाबाद (धाराशिव) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील (Padmasingh Patil) यांनी त्यांचा पराभव केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वर्षीची विधानसभा निवडणूक त्यांनी तुळजापूर मतदारसंघातून (Tuljapur Constituency) लढवली होती. त्या निवडणुकीत चव्हाण यांना पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
तरुणपणात कुस्त्यांचे आखाडे गाजवणारे अण्णा काँग्रेसचे (Congress Government) सरकार असताना हे कॅबिनेटमंत्री होते. त्यापूर्वी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्ये अध्यक्षपद त्यांनी दोनवेळा भूषवले. लोकांमध्ये सहज मिसळणारा नेता, अगदी जमिनीवर बसून लोकांशी गप्पा मारणारा नेता, अशी अण्णांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात लढत झाली. राजेनिंबाळकर(Omraje Nimabalkar) हे सव्वातीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. अर्चनाताई या तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. पती आमदार असलेल्या तुळजापूर मतदारसंघातून त्या 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर राहिल्या होत्या.
तुळजापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य पाहता काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आता अण्णांनी दावा ठोकला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेतेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. वयामुळे अण्णा निवडणुकीसाठी इच्छुक नसतील, असा समज कदाचित काँग्रेसच्या नेत्यांचा झालेला असावा. अता अण्णांनी दंड थोपटल्यामुळे उमेदवारीसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.