Uddhav Thackeray Uday Samant sarkarnama
मराठवाडा

MLC Election : बंडोबा झाले थंडोबा! मंत्री उदय सामंत फॉर्मात; थेट उद्धव ठाकरेंना इशारा, 'तुमचे 42 मतदारही...'

Uday Samant Vs Uddhav Thackeray : बंडखोरांना थांबवणयात उदय सामंत यांना यश आले आहे. त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना इशारा देत त्यांचे मतदार फुटणार असल्याचा दावा केला आहे.

Jagdish Pansare

Parbhani-Hingoli MLC Election : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीच्या बंडखोरांना थंड करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत खास मोहिमेवर आले होते. यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले. महायुतीच्या बंडखोरांना रोखण्यात यश आल्यानतर उदय सामंत यांचा काॅन्फीडन्स भलताच वाढलेला दिसला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असलेले 42 मतदारही त्यांच्यासोबत राहू देणार नाही, ती देखील सईद खान यांनाच मिळतील, असा दावा सामंत यांनी केला.

सन्मानाने माघार घ्या, दबावातून नाही, आज माघार घेतली तर तुमचाही आम्ही योग्य सन्मान करू, असे आवाहनही सामंत यांनी केले. महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सईदखान पठाण यांच्या प्रचारासाठी तसेच महायुतीतील घटक पक्षात गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली धुसफुस दुर करण्यासाठी उदय सामंत गुरुवारी परभणी दौऱ्यावर होते. तीनही पक्षाच्या नेत्यांशी गुप्त चर्चा झाल्यानंतर त्यांनी महायुतीच्या मेळाव्याला हजेरी लावली.

परभणी-हिंगोली विधान परिषेदीची जागा कमी मतदार, सदस्य असतानाही शिवसेनेला सोडवून घेण्यात यश मिळाले होते. त्यामुळे भाजपासह, राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली होती. विशेषतः राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात सर्वाधिक जागा असताना देखील ही जागा मिळाली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकींपासून या सर्वच घटक पक्षातील नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरु होती.

कुठे भाजपा-शिवसेना, कुठे शिवसेना-राष्ट्रवादी तर कुठे भाजपा-राष्ट्रवादी असा संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळे नेत्यांमध्ये देखील कटूता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांना एकत्रित आणण्यासाठी, त्यांची मने जुळावीत म्हणून उदय सामंत हे परभणीत आले होते. मतदार संघात महायुतीची ताकद मोठी आहे, सईदखान यांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

'उबाठा'च्या माघारीसाठी प्रयत्न..

महायुतीतील बंडखोरांना थोपवण्यात यश आल्यानंतर उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारालाही माघारीचे आव्हान केले होते. सन्मानपुर्वक अर्ज मागे घ्यावा, भविष्यात त्यांच्यासोबत राहू असे, आवाहन केले होते. या मतदार संघात उबाठाचे 42 मतदार आहेत, ते पण त्यांच्यासोबत ठेवणार नाही, असा इशाराही सामंत यांनी दिला होता. त्यांच्या पक्षाची सर्व मते सईदखान यांना मिळतील, असा दावाही सामंत यांनी केला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर आता महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर, महायुतीचे सईदखान पठाण तर अपक्ष सुशिलकुमार देशमुख रिंगणात आहेत. या तिरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. सईद खान यांना बिनविरोध निवडून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न मात्र फसला. या मतदरासंघात एकूण 465 मतदार आहेत. संख्याबळावर नजर टाकली तर राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) 131, भाजपाचे 99, शिवसेनेचे 77, काँग्रेसचे 59, शिवसेना (उबाठा) 43, यशवंतसेनेचे 27, जनसुराज्य शक्तीचे 13, रासपाचे 5, पुर्णा शहर आघाडी व जनता दलाचे प्रत्येकी 2, अपक्ष 6 आणि वंचित बहुजन आघाडीचा एक सदस्य असे बलाबल आहे.

राष्ट्रवादीकडून युती धर्माचे पालन

या निवडणूकीसाठी महायुतीकडून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या डझनभर नेत्यांनी उमेदवारी मागीतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने तर मतदार सदस्य सर्वाधिक असल्याने जागेवर हक्क सांगीतला होता. माजी आमदार विजय भांबळे, माजी महापौर प्रताप देशमुख, नगरसेवक विजय जामकर यांनी चांगलीच ताकद लावली होती. जागा राष्ट्रवादीलाच सुटेल असा विश्वास त्यांना होता. परंतु ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला होता.

सईद खान यांचा मार्ग सुकर

विजय जामकर तसेच संग्राम जामकर यांनी यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्याच बरोबर भारतीय जनता पक्षाकडून देखील पाच जणांची नावे पाठवण्यात आली होती. परंतु अर्ज भरला मात्र नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी. या उमेदवारांचा युतीचे उमेदवार शिवसेनेचे सईदखान यांना फटका बसू शकतो म्हणून माघारीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आमदार राजेश विटेकर यांच्या माध्यमातून उमेदवारांना माघारीच्या सूचना केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माघारीसाठी फोनफानी केल्याची माहिती आहे. तर भाजपाच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांनी शिष्टाई केली. या तीनही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र आहे.

SCROLL FOR NEXT