Shivsena UBT News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : संभाजीनगरात उद्धव ठाकरेंचाच आवाज, सहा जागा लढवणार ?

Uddhav Sena will contest six seats in Sambhajinagar district : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सुरूंग लावला. वैजापूर, पश्चिम, सिल्लोड या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या तगड्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेत महायुतीला दणका दिला.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 News : भाजपने राज्यातील 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही बऱ्याच जागांवर मतभेद असल्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र उद्धव ठाकरे 2019 मध्ये युतीत लढलेल्या सगळ्या जागांवर पुन्हा लढण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी जिल्ह्यातील पाच संभाव्य उमेदवारांना पक्षाने कामाला लागा, असे आदेश दिल्याचे सांगितले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दानवे यांनी (Chhatrapati Sambhajinagar) संभाजीनगर पश्चिम मध्ये राजू शिंदे, मध्य- किशनचंद तनवाणी, सिल्लोड-सुरेश बनकर, वैजापूर दिनेश परदेशी, कन्नड- विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. अधिकृत घोषणा झाली नसली तरी या सगळ्यांना कामाला लागा, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यात आणखी एक जागा वाढू शकते, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

पैठण विधानसभेच्या जागेवर अद्याप एकमत न झाल्यामुळे या मतदारसंघाचा उल्लेख दानवे यांनी टाळला, पण एक जागा वाढू शकते असे सांगत संकेतही दिले. पैठणची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली तर नऊ पैकी सहा मतदारसंघातून लढत महाविकास आघाडीत संभाजीनगरमध्ये शिवसेनाचा मोठा भाऊ ठरणार आहे. गद्दारांना मातीत गाडा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी संजय शिरसाट, मंत्री अब्दुल सत्तार, वैजापूरचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे आणि पैठणमध्ये खासदार भुमरे यांचे सुपुत्र यांच्याविरोधात मोर्चे बांधणी केली आहे. (Shivsena) सिल्लोडमध्ये भाजपचे सुरेश बनकर, पश्चिममध्ये राजू शिंदे, वैजापूरमध्ये दिनेश परदेशी यांना पक्षात घेत सत्ताधारी आमदारांचा काट्याने काटा काढण्याची रणनिती आखली आहे.

दोन वर्षापुर्वी भाजपने शिवसेना फोडली, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सुरूंग लावला. वैजापूर, पश्चिम, सिल्लोड या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या तगड्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेत महायुतीला दणका दिला. आता शिवबंधन हाती बांधलेले हे संभाव्य उमेदवार महायुतीला कशी टक्कर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खासदार संदीपान भुमरे यांनी सहा वेळा निवडणूक लढवलेल्या पैठणवर उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अद्याप इथून कोणालाच कामाला लागा असा आदेश मिळालेला नाही. येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील सहाही उमेदवारांच्या अधिकृत नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT