Uddhav Thackeray latest news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात आक्रमक भूमिका घेतली असून, परभणीतील सभेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘उबाठा’ या संबोधनावरून चांगलेच सुनावले.
'उबाठा नाही… उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा,' असे ठणकावत त्यांनी पुन्हा एकदा विरोधक आणि टीकाकारांना थेट संदेश दिला.
परभणीतील पत्रकार परिषदेदरम्यान एका माध्यम प्रतिनिधीने प्रश्न विचारताना “उबाठा” असा उल्लेख केला. त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे म्हणाले, "उबाठा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray)! ज्यांच्या घशात बाठा अडकतो तेच उबाठा म्हणतात. बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांच्या घशात त्यांचं नाव घेताना बाठा अडकण्याचं कारण नाही."
या वेळी त्यांनी विरोधकांवर नेहमीच्या शैलीत उपरोधिक हल्ला चढवत म्हटले, 'ज्यांच्या घशात बाठा अडकतो त्यांचं ऑपरेशन केलं पाहिजे. काही लोक मुद्दाम ‘उबाठा’ (Shivsewna UBT) म्हणतात, कारण त्यांना बाळासाहेबांचं नाव घ्यायचंच नसतं.'
दरम्यान, शिवसेना फुटीनंतर पक्षात मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मूळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना नव्याने पक्षाची ओळख उभी करत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल हे चिन्ह स्वीकारावे लागले.
या घडामोडीनंतर माध्यमांमध्ये आणि राजकीय चर्चांमध्ये 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या मोठ्या नावाऐवजी शॉर्टकट म्हणून “उबाठा” हा शब्द प्रचलित झाला. मात्र उद्धव ठाकरे यांना हा उल्लेख मान्य नसल्याचे त्यांनी याआधीही अनेकदा स्पष्ट केले आहे. सध्या परभणी येथील सभेनंतर आता उद्धव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर असून, तिथेही राजकीय वातावरण तापले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही साथ सोडल्यानंतर ठाकरे गटासाठी हा दौरा प्रतिष्ठेचा मानला जात आहे.
परभणीतील या पत्रकार परिषदेत 'उबाठा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेच म्हणा', या एका वाक्याने उद्धव ठाकरे यांनी पुन्हा स्पष्ट केले की, पक्षाची ओळख आणि बाळासाहेबांच्या नावाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. आगामी राजकीय संघर्षात हीच भूमिका आणखी आक्रमक होताना दिसण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.