Uddhav Thackeray and Amit Shah News
Uddhav Thackeray and Amit Shah News Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : ...असे नाही की मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi News : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे नाव घेता आणि पाठीवर वार करता. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी एकत्र आलो होतो, हो आलो होतो. मात्र, आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही घट्ट झालो. अमित शाहांनी पुण्यात म्हटले की मी सत्तेसाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) तळवे चाटले. असे नाही की मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. मात्र, काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी होती. मात्र, मी फक्त एवढेच म्हणालो, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचे काय चाटता, असा रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

नितीश कुमार आणि लालू यांचे सरकार पाडून तुम्ही नितीश कुमारांचे काय चाटत होतात? आता मोदी म्हणतायत की त्यांची प्रतिमा खराब करण्याचे काम चालले. कोण करते? आम्ही करतो का? मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणतो. आम्ही गप्प बसायचे. आम्ही काहीही बोललो तर खटले दाखल होतात.

मोदींना काहीही म्हटले तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान असे कसे. तुमच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पक्ष आहे. आज देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. अमित शाह यांनी संगमांवर आरोप केले होते. संगमांचे सरकार म्हणजे देशातले सगळ्या भ्रष्ट सरकार आहे, असे आरोप केले होते. त्यानंतर संगमांनी झटका दिला, मग आता तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहात. तुम्ही संगमांचे काय चाटता आहात?, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.

भाजपाचे (BJP) म्हणजे दिसला भ्रष्ट, की घेतला पक्षात, देशभरातली भ्रष्ट माणसे या पक्षात आहे. यांच्या पक्षाचे नाव भाजप आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचे नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असे ठेवा, असे ठाकरे म्हणाले. आम्ही तुमचे हिंदुत्व मानायला तयार नाही. देशात एक विधान, एक निशाण असे तुम्हाला राबवायचे आहे, दुसरा पक्षच तुम्हाला शिल्लक ठेवायचा नाही. देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. सावरकरांचे स्वप्न होते अखंड हिंदुस्थान. अमित शाह म्हणाले होते की शिवसेनेला जमीन दाखवा. मी म्हटले मला जमीन बघायची आहे. जमीन दाखवायची असेल, तर पाकव्याप्त काश्मीरची इंचभर तरी जमीन जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानू. नाहीतर पुचाट लेकाचे हिंदुत्वाच्या गप्पा करू नका, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

वल्लभभाई पटेल नसते, तर मराठवाडा मुक्त झाला नसता. त्यांनी मराठवाडा मोकळा केला मात्र, तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाहीत? वल्लभभाईंपासून काहीतरी घ्या. निवडणुका आल्या की लुटुपुटूचे काहीतरी करणार आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या असे होते. भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहात आहे. न्यायालयामध्ये आपली माणसे घुसवायला पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचे ऐकल पाहिजे असे हे म्हणत आहेत. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT