Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant News : मुख्यमंत्र्यांकडून ठाकरे, तर सावंतांच्या टार्गेटवर खासदार-आमदाराची जोडी

Shital Waghmare

Daharashiv News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिवमधील शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनीही ठाकरे गटाचे खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांच्यावर तोफ डागली. अडगळीत पडलेल्या, ज्यांची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची लायकी नाही, अशा लोकांना मी आमदार केले. त्यांनीच आपल्यावर खूप शिंतोडे उडवले, आपल्यामुळेच ते राजकारणात जिवंत झाले, अशा शब्दांत तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांना नाव न घेता लक्ष्य केले.

तेरणा कारखान्यातील भंगार यांनी विकले, शेतकर्‍यांची तर वाट लावली. जे काही असेल ते हम और हमारा कुटुंब कोणताही ठेका असो तो मामाला, काकाला आणि भावाला, अशीच पद्धत होती. जय भवानी, जय शिवाजी म्हणणारे शिवसैनिक यांनीच देशोधडीला लावले, असा आरोपही सावंत यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजक व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सावंत यांनी भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला.

या वेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप करत धाराशिव जिल्ह्यातील सहकारी संस्था मागील सत्ताधार्‍यांनी मोडीत काढल्याचे म्हटले. तेरणा कारखान्याची काय अवस्था करून टाकली होती? आपल्या सर्वांना माहिती आहे. दूध संघाचीही तीच अवस्था. जिल्हा सहकारी बँकही देशोधडीला लावली. शिवसैनिकांसाठी यांनी एकही काम केले नाही. जिल्ह्यातील सहकारी चळवळ जिल्ह्यातीलच पुढार्‍यांनी मोडीत काढली.

मुख्यमंत्री म्हणून आपण सर्वांसमक्ष आश्वासन द्यावे, आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील पिचलेला शेतकरी आणि मोडीत निघालेली सहकार चळवळ पुन्हा एकदा जिवंत करण्याचे काम आपण करणार आहोत. यासाठी जिल्हावासीयांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी करत आहे, असे म्हणत सावंत यांनी मुख्यमंत्र्यांनाच गळ घातली. ही सगळी व्यवस्था पुन्हा एकदा नव्याने उभी करावयाची आहे. कारण सहकार चळवळीत मोठ्या आदराने राज्यातील ज्या एक-दोन जिल्ह्यांचे नाव घेतले जात होते, त्यात धाराशिव जिल्हा प्राधान्याने येत होता. राज्यासमोर या जिल्ह्याने विविध उपक्रम राबविले आहेत. ते सगळे विधायक उपक्रम मोडीत निघाले आहेत.

हे सगळे कशामुळे झाले? असा सवाल उपस्थित करत माझ्या शेतकरी बांधवांना रस्त्यावर वणवण करीत फिरण्याची वेळ कुणामुळे आली, असा सवालही सावंत यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री महोदयांचे उंबरठे झिजवून प्रसंगी रडून, हट्ट करून त्यांच्याकडून शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे नगरविकास खाते होते. शेकडो कोटी रूपये शहराच्या विकासासाठी ज्यांनी आणले, त्यांनीच आज शहर बकाल करून टाकले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहराचा अक्षरशः उकिरडा झाला आहे. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देण्यातही यांना यश आलेले नाही. आजही आठ दिवसाआड एकदा शहरात पाणीपुरवठा केला जातो. शहरातील रस्ते, गल्लीबोळ कचर्‍याच्या ढिगाखाली दबले आहेत. कचरा उचलण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. शेकडो कोटी रुपये आणलेला निधी कुठे गेला? अशा शब्दांत सावंत यांनी विरोधकांच्या भ्रष्ट कारभाराचा समाचार घेतला.

निधी आम्ही आणला, फलक दुसरे झळकताहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांनीच शहरातील रस्त्यांसाठी 154 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अद्याप अध्यादेश निघायाचा आहे, तोवरच फलकबाजी सुरू आहे. निधी आम्ही आणला आणि फलक दुसरे झळकावत आहेत, असा टोलाही सावंत यांनी विरोधकांना लगावला. तेरणा कारखाना भाडेकराराने घेत असताना कोण अडचणी निर्माण करत होते? हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दम दिला आणि लातूरकरांनी पाय आखडून घेतले, असा चिमटाही सावंत यांनी माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना काढला.

(Edited by Sachin waghmare)

SCROLL FOR NEXT