Tum Se Na Ho Payega | Shivsena UBT Agitation Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : 'तुमसे ना हो पायेगा' आंदोलनानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ताधाऱ्यांवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक?

Marathwada Mukti Din : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर १७ सप्टेंबरला महायुती सरकारविरोधात निदर्शनेही करण्यात येणार आहेत.

Jagdish Pansare

Shiv Sena UBT News : मराठवाड्याचा विकास 'तुमसे ना हो पायेगा' या जनआंदोलनाने संपूर्ण मराठवाडा ढवळून काढल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्ताधारी महायुतीवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे. १७ सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन आणि मुक्तीसंग्रामातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले जाते.

याची जय्यत तयारी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असतानाच १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकावर जाऊन अभिवादन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधीच ठाकरेंकडून अभिवादनाचा कार्यक्रम घेऊन सरकारवर कुरघोडी करण्याची रणनिती आखण्यात आली आहे.

महापालिकेकडून या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेला ही वेळ कळवण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य कार्यक्रमाआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अभिवादन केले जाणार असल्याने शासकीय कार्यक्रमाचे महत्त्वच कमी होणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या भागाच्या तोंडाला कायम पाने पुसली गेली आहे. मराठवाड्याच्या योजना निधी आभावी रखडल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेने आठही जिल्ह्यात 'तुमसे ना हो पायेगा' हे जनआंदोलन उभारत सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगरमध्ये असतानाच शिवसेनेच्यावतीने निदर्शनेही करण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणाऱ्या या निदर्शन कार्यक्रमात उद्धव ठाकरे स्वत: सहभागी होणार आहेत.

तत्पूर्वीच म्हणजे १६ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता सिद्धार्थ उद्यानात जाऊन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मारकाला उद्धव ठाकरे अभिवादन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित मुख्य अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा व पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

परवानगीची काय गरज? - दानवे

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी कोणीही स्मारकाला अभिवादन करू शकतो, त्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. आम्ही अशी कुठलीही परवानगी महापालिकेकडे मागीतलेली नाही. १६ सप्टेंबर रोजी ११ वाजून ४५ मिनिटांनी आम्ही अभिवादन करणार आहोत, एवढे फक्त आम्ही महापालिकेला कळवले आहे, परवानगी मागीतलेली नाही, असे आमदार अंबादास दानवे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

११ वाजून ४५ मिनिटांची वेळ ही जसं आपण स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्टला रात्री बारा वाजता साजरा करतो, त्याच पद्धतीने आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १६ सप्टेंबर रोजी रात्री बारा नंतर म्हणजे १७ सप्टेंबर सुरू होतो, त्यावेळी अभिवादन करणार आहोत, असेही दानवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT