Kailas Patil News Sarkarnama
मराठवाडा

Kailas Patil: जीवाभावाचा खासदार मित्र पक्ष सोडून गेला तरी ठाकरेंचा आमदार डगमगला नाही! व्यक्त केला दांडगा विश्वास

Kailas Patil: 'ऑपरेशन टायगर टू'ची चर्चा आणि त्यात कैलास पाटील यांच्याच भोवती संशयाचे जाळे निर्माण करत सत्ताधारी पक्षांनी डाव टाकला आहे.

Jagdish Pansare

Dharashiv Politics: जीवाभावाचा खासदार मित्र पक्ष सोडून गेला, धाराशीव-कळंब या मतदारसंघातील दहा नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाची वाट धरली, अशी चोहोबाजूंनी संकट आलेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी या सगळ्या परिस्थितीवर मात करून नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा पक्ष उभारू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

'ऑपरेशन टायगर टू' ची चर्चा आणि त्यात कैलास पाटील यांच्याच भोवती संशयाचे जाळे निर्माण करत सत्ताधारी पक्षांनी डाव टाकला आहे. यावर प्रतिडाव टाकत कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील बडे नेते संजय निंबाळकर भाजपचे रामेश्वर शेटे व शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मातोश्रीवर मोठा प्रवेश सोहळा घडवून आणला. सत्ताधाऱ्यांना कैलास पाटील यांचा हा 'करार जवाब' होता.

पण याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण मुंबई मातोश्रीवर प्रवेश सोहळा होत नाही तोच भाजपाने कैलास पाटील यांच्या मतदारसंघातील कळंब नगरपालिकेतील तब्बल दहा नगरसेवकांना गळाला लावले. पाटील यांना हा मोठा धक्का होता. मातोश्रीवर प्रवेश सोहळा आणि त्यानंतर झालेल्या बैठकीतील एकही नगरसेवक किंवा पदाधिकारी भाजपामध्ये गेलेल्या नगरसेवकांमध्ये नाही याबद्दल मात्र त्यांनी समाधान व्यक्त केले.

भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना काय दिले असेल, हे मी वेगळे सांगायची गरज नाही, जे गेले त्यांच्यावर विश्वास ठेवला ही चूकच झाली. निश्चितच भविष्यात या चुकातून धडा घेऊ आणि जे चुकले त्यांना धडा शिकवू, असा इशारा कैलास पाटील यांनी या पक्ष फुटीवर भाष्य करताना दिला.

शिवसेना हा पक्ष काही कायम सत्तेत राहण्यासाठी निर्माण झालेला पक्ष नाही, हा पक्ष जनतेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष आहे. त्यामुळे कितीही आले आणि गेले तरी शिवसेनेचा संघर्षाचा वसा यापुढेही सुरूच राहील. नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन आम्ही धाराशीव जिल्ह्यात पुन्हा पक्ष उभा करू. निश्चितच काही प्रमाणात पडझड झाली आहे, पण आम्ही हताश, निराश होणार नाही. पुन्हा भरारी घेऊ, असेही कैलास पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT