raju shinde uddhav thackeray sarkarnama
मराठवाडा

Raju Shinde : राजू शिंदेंना शिवसेनेत प्रवेश करताना उद्धव ठाकरेंनी विधानसभेचा शब्द दिला?

Raju Shinde News : आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा शब्द मिळाल्यामुळेच त्यांनी शिवबंधन बांधून घेतल्याची चर्चा आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : कोणत्या नेत्याला, पदाधिकाऱ्याला शिवसेनेत प्रवेश देताना उमेदवारी किंवा पदाचा शब्द देण्याची प्रथा नाही.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे ( Raju Shinde ) यांच्या पक्षप्रवेशानंतर असुरक्षिततेच्या भावनेतून काही मंडळी चुकीची माहिती पसरवत आहेत, असं शिवसेना ( Shivsena ) ठाकरे गटाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी स्पष्ट केलं.

"विशेषतः पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्यांकडून हे केले जात आहे. यात काही नेत्यांचाही समावेश आहे," असा आरोप राजू वैद्य यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरात झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात भाजपचे ( Bjp ) राजू शिंदे व त्यांच्यासह काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा शब्द मिळाल्यामुळेच त्यांनी शिवबंधन बांधून घेतल्याची चर्चा आहे.

त्यामुळे याच मतदारसंघातील विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजी आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेचे खंडण करत महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी उमेदवारीबाबत कोणालाही शब्द दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.

राजू वैद्य म्हणाले, "पक्षात उमेदवारीबाबत कोणालाही कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही. राजू शिंदे यांच्या प्रवेशाने काही इच्छूकांना असुरक्षित वाटत असल्याने पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून चुकीची माहिती पसरविली जात आहे. पक्षात असा शब्द दिला जात नाही. पक्षात केलेल्या कामाचे मुल्यमापन केले जाते, सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर जो विजयी होऊ शकतो, अशा व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाते."

"ज्यांचा पक्षाशी काही संबंध नाही, मतदारसंघाशी संबंध नाही किंवा पदावर असूनही सक्रियतेने कार्यरत नाहीत, अशा लोकांचा पक्ष विचार करू शकतो का?" असा सवाल राजू वैद्य यांनी केला आहे. उद्धवसाहेबांनी उमेदवारीच्या बाबतीत कोणालाही शब्द दिलेला नाही, त्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याचा पुनरुच्चार वैद्य यांनी केला. एकूण राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटात विशेषतः पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छूकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असल्याची कबुली या निमित्ताने देण्यात आली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT