Aurangabad Central Assembly Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Central Assembly Constituency : संभाजीनगर `मध्य` मतदारसंघात पुन्हा सर्व्हेचे आश्वासन देत ठाकरेंकडून नाराजांची बोळवण ?

Uddhav Thackeray promises to re-survey some constituencies : उमेदवारी अर्ज दाखल करायला आजपासून सुरवात झाली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात जागा वाटपावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरू आहेत.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहरातील पश्चिम, मध्य ग्रामीणच्या सिल्लोड, वैजापूर आणि कन्नड विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले. मुंबईत मातोश्रीवर बोलावून या मतदारसंघातील सगळ्या उमेदवारांना `एबी` फार्म दिल्याचीही चर्चा आहे. पैकी पश्चिम, सिल्लोड आणि वैजापूर मतदारसंघात भाजपमधून आयात केलेल्या राजू शिंदे, सुरेश बनकर, दिनेश परदेशी यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.

यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तानातानी सुरू झाली आहे. संभाजीनगर `मध्य` मतदारसंघातील इच्छुकांनी थेट मुंबई गाठत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. पक्षाच्या सर्व्हेमध्ये आम्ही कसे पुढे आहोत, तुमच्याकडे आलेला सर्व्हे चुकीचा आहे, असा दावा त्यांनी केला. यावर मध्य मतदारसंघात आपण पुन्हा सर्वे करू, असे आश्वासन देत उद्धव ठाकरे यांनी या नाराजांची बोळवण केल्याची माहिती आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करायला आजपासून सुरवात झाली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात जागा वाटपावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरू आहेत. दिल्ली आणि इकडे मुंबईत मातोश्रीवर बैठकावर बैठका घेतल्या जात आहे. अशावेळी ज्या उमेदवारांना एबी फाॅर्म दिले त्यांच्याविरोधात पक्षात नाराजी वाढू लागल्याने उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.

मध्य मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना एबी फाॅर्म दिल्याचे सांगितले जाते. तनवाणी हे याआधी शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत. (Shivsena) शहरातील मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या मध्य मतदारसंघात 2009 मध्ये शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी बंडखोरी केली होती. विकास जैन यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवत जैस्वाल यांनी विजय मिळवला होता.

2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली आणि मध्यमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या किशनचंद तनवाणी यांनी तेव्हा ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती. परंतु मतविभाजनाचा फटका शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना बसला आणि एमआयएमचे इम्तियाज जलील या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते. दरम्यान, प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेनेत घरवापसी केली आणि 2019 च्या उमेदवारीवर दावाही.

अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी दिली. तेव्हा शिवसेना-भाजपची युती असल्याने बंडाच्या तयारी असलेल्या तनवाणी यांना नेत्यांनी शांत केले होते. एमआयएमकडे गेलेली मध्य ची जागा शिवसेनेने पुन्हा जिंकली. परंतु महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेत झालेल्या बंडात प्रदीप जैस्वाल यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान पुन्हा भाजपमध्ये गेलेले किशनचंद तनवाणी पुन्हा शिवसेनेत परतले. पक्षाने त्यांना आता उमेदवारी दिली, पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध करत थेट उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. ठाकरेंनी पुन्हा सर्व्हे करण्याचे आश्वासन दिले असले तरी तशी शक्यता नाहीच. त्यामुळे एकप्रकारे नाराजींची ठाकरेंनी बोळवणच केली असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT