Mumbai News : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जागा वाटपाचा घोळ कायम आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 'मातोश्री'वर हा घोळ मिटवण्यासाठी तब्बल तीन तास तळ ठोकून होते. या बैठकीत नेमकं काय झालं, याची उत्सुकता असतानाच, नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे.
'शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि बाळासाहेब थोरात यांच्यात काय विषय झाला, याचा पहिल्यांदा आढावा घेतला जाईल, त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहू', असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य कसे असेल, हे अवघे काही तासांत स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घमासान चालू आहे. विदर्भातील जागांसाठी हा खेळ चालला असून, काँग्रेस विदर्भातील जागांसाठी तडजोड करायला तयार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील भूमिकेवर ठाम आहे. या दोन्ही पक्षात टोकाचा वाद वाढला असून, शरद पवार यांच्या हस्तक्षेपानंतर काँग्रेसकडून पुढाकार घेत, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना 'मातोश्री'वर चर्चेला पाठवलं आहे.
बाळासाहेब थोरात 'मातोश्री'वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत असतानाच, नाना पटोले यांनी या बैठकीवर मोठं विधान केलं आहे. "जागा वाटपावरून वाद होतच असतात. कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, विरोधक यांचा दबाव असतो. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसकडून पाठवण्यात आलं आहे. तेथून ते आल्यानंतर काँग्रेस नेत्यांची त्यांच्या समवेत बैठक होईल. मातोश्रीवरील बैठकीत नेमकं काय झालं, आम्ही प्रमुख नेते आढावा घेऊ. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही सहभागी होऊ. 25-30 जागांचा प्रश्न आहे, तो आज सुटेल", असे नाना पटोले यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंची कोणतीही नाराजी नाही. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ आहे, तो आज सुटेल. परंतु आमच्या पेक्षा महायुतीत सर्वाधिक गडबड आहे. त्यांच्या नेत्यांच्या बंगल्यावर गेल्यावर, तिथं कशा हणामाऱ्या सुरू आहेत, याकडे देखील नाना पटोले यांनी लक्ष वेधले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठकांवर देखील नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. 'खेळ सुरू झाला आहे, भाजपने हा खेळ सुरू केला होता, भाजप या खेळात कशी हारते आणि कशी उघडी पडते, ते बघाच', असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.