Nagpur News, 16 Jul : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी निधीमध्ये घोटाळा-चोरी झाल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपविरोधात रान पेटवलं आहे. उद्धव ठाकरे यांनी तर राम मंदिराला आलेल्या देणग्या, दागिने, सोन्याच्या विटा चोरीला गेल्या आहेत आणि ती रक्कम राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरली जात आहे, असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपवर केला आहे.
याचा निषेध म्हणूनच 5 जुलै रोजी मुंबईच्या दादर येथील हनुमान मंदिरात निषेध म्हणून पहिला 'रामरक्षा' उपक्रम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सुरू झाला. रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा आणि हनुमान स्तोत्राचे पठण यावेळी करण्यात आले. त्यानंतर आता येत्या 18 जुलै रोजी नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात आंदोलनाचा दुसरा टप्पा असणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्याकडे लागले आहे. यापुढे राज्यात सर्वत्र हे आंदोलन आणि रामरक्षा उपक्रम राबवण्याचा निर्धार ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. नागपूरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता, मग रामरक्षा उपक्रमात सहभागी व्हा, असे आवाहन संजय राऊत यांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केले आहे. 'श्री. देवेंद्र फडणवीसजी, जय महाराष्ट्र! आपण एक प्रखर राम भक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात. अयोध्यातील रामजन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे नेहमी सांगता. आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून रामजन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले.
याच राम मंदिरात चोरी, लूटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोध्येतील चोरीबाबत शोक व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या राममंदिर बाबत लोकात जागृती आणण्यासाठी रामरक्षा उपक्रम सुरू केला. रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या.
दिनांक 18 जुलाई 2026 शनिवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता राम मंदिर, रामनगर नागपूर येथे रामरक्षा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. सदर कार्यक्रम नागपुरात होत असल्याने आपण या रामरक्षा उपक्रमात आवर्जून सहभागी होऊन राम भक्तांना शुभेच्छा द्याव्यात, ही आग्रहाची विनंती म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.