Marathwada March For Affected Farmers : अतिवृष्टी, महापूराने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची थाप तुम्ही मारली होतीत. आज शेतकरी संकटात असताना पून्हा इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज दिले म्हणून पुन्हा थाप मारत आहात. हे इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज नाही, तर सर्वात मोठी थाप आहे, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
हंबरडा मोर्चाच्या सभेत उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारवर इतिहासातील सर्वात मोठी थाप दिल्याचा आरोप केला.
उद्धव ठाकरेंनी सरकारच्या पॅकेज घोषणेवर टीका करत “ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे” असे म्हटले.
मराठवाड्यातील हंबरडा मोर्चा या भाषणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena) वतीने शेतकरी कर्जमुक्ती, हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत, पीक विमा व इतर मागण्यासाठी 'हंबरडा' मोर्चा काढण्यात आला. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, अॅड. अनिल परब, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह मराठवाड्यातील पदाधिकारी,शिवसैनिक आणि शेतकरी या हंबरडा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाचे रुपांतर छोट्या सभेत झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकारवर सडकून टीका केली. पंधरा दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो तेव्हाच सरकार कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत या सरकारला आम्ही सोडणार नाही, हे मी जाहीर केले होते. शिवसेना तुमच्यासोबत आहेच पण जेव्हा तुमच्यावर संकट असेल तेव्हा तर तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत असूच, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी शेतकऱ्यांशी बोलूनच केली आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांना अमान्य आहे. सरकारचे पॅकेज ही मोठी थाप असून स्वतःचीच पाठ खाजवून थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. पॅकेजची घोषणा झाल्यावर सगळ्यांना असे वाटले की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज आहे. पण नाही ही इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत इतकी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारलेली नाही. इतकी मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे मागत आहोत. त्यामुळे ते सहजासहजी वठणीवर येणार नाहीत, तुम्हाला हातात चाबूक घ्यावा लागेल तेव्हाच हे वठणीवर येतील. परवा देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. त्यांच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का? ज्या पंतप्रधानांना आपण जिथे चाललो आहोत तिथली परिस्थिती माहित नाही, आपण त्यांच्याकडे काय न्याय मागत आहोत?
राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं, अशी परिस्थिती आहे. एका शेतकऱ्याच्या भाषणातील मुद्याचा उल्लेख करत कैलास तुम्ही जे म्हणालात, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, खरं आहे ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे. मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतोय की, तुमची नियत असेल तर दिवाळीपूर्वी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
कर्जमुक्ती करावीच लागेल!
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावीच लागेल, असे ठणकावून सांगतानाच तुमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मतावर आले, आणि त्याचंच तुम्ही राजकारण करता. मग आम्ही त्यांच्या न्याय, हक्कासाठी लढत असू तर त्यात चुकीचे काय? यात तुम्हाला राजकारण का दिसते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. कर्जाचे पुनर्गठन करणार असे सांगितले, पण आम्हाला हे पुनर्गठण नको, आजचं मरण उद्यावर नको. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे.
मला आरसा पाहण्याचा सल्ला देता, तुम्हाला काय अधिकार? हे विचारता. हो मला अधिकार आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती. कोणत्याही अटी-शर्थी न लादता ती केली होती. माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली नाही, तर मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी आम्ही तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला.
1. उद्धव ठाकरेंनी कोणत्या कार्यक्रमात टीका केली?
उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात झालेल्या “हंबरडा मोर्चा” या सभेत फडणवीस सरकारवर टीका केली.
2. उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारवर नेमका आरोप काय केला?
त्यांनी सरकारने जाहीर केलेले ‘इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज’ हे खोटं असल्याचा आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला.
3. हंबरडा मोर्च्याचा उद्देश काय होता?
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या अडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
4. भाजपकडून या आरोपांना काय प्रतिक्रिया आली?
भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राजकीय स्टंट म्हणत फेटाळले आणि सरकार जनतेसाठी काम करत असल्याचा दावा केला.
5. या भाषणामुळे काय परिणाम झाले?
या भाषणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.