Shivsena UBT News : विधान परिषदेच्या दहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रिक्त जागेवर कोण? याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवली तर आम्ही पाठिंबा देऊ, दुसरा उमेदवार दिला तर निवडणूक लढवू असे सांगत काँग्रेस ठाकरेंची गोची केली आहे.
उद्धव ठाकरे यांना राजकारणाचा उबग आला आहे. विधान परिषदेत बसण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे पक्षातील इतर इच्छुकांच्या इच्छा मात्र जागृत झाल्या आहेत. राज्य पातळीवर पक्षाची बाजू भक्कमपणे मांडत विरोधकांना खिंडीत पकडणाऱ्या उपनेत्या सुषमा अंधारे, गेली अडीच-तीन वर्ष विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे या दोन नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील राजकीय परिस्थिती पाहता पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद या सगळ्याच निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फटका बसला. जे काही थोडे फार यश मिळाले त्याचे श्रेय अंबादास दानवे यांना जाते.
छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेचे अनुक्रमे सहा नगरसेवक आणि नऊ सदस्य निवडून आले आहेत. त्याआधीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाला होता. संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची सगळी सुत्रं उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्याकडे दिली होती. अगदी चंद्रकांत खैरे यांचा विरोध डावलून. त्यामुळे मिळालेल्या यश आणि अपयशाचे मानकरीही दानवे हेच ठरतात.
आतापर्यंत काय झाले, याही पेक्षा भाजपासह शिंदेच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मराठवाड्यात नव्याने संघटनेची बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी आक्रमक नेत्याची गरज आहे जी अंबादास दानवे पूर्ण करू शकतात. गेली पंचवीस वर्ष ते पक्षात कार्यरत आहेत. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्षफुटीच्या आधीपर्यंत संघटना बांधून ठेवली होती. पक्षाचे दोन तुकडे झाल्यानंतर मात्र त्यांचे नियंत्रण सुटले. परंतू विविध आंदोलन, शेतकरी, कामगार, बेरोजगारी असे सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न घेऊन त्यांनी आंदोलने केली. ज्यामुळे पक्ष जिवंत आणि चर्चेत राहिला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी मराठवाड्याला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न निश्चित उद्धव ठाकरे करतील अशी आशा आहे. आता यात सुषमा अंधारे, की अंबादास दानवे यापैकी एकाची निवड उद्धव ठाकरे यांना करावी लागणार आहे. अंधारे, दानवे हे दोघेही आक्रमक नेते, उत्कृष्ट वक्ते आणि विरोधकांची कोंडी करण्यात हातखंडा असलेले नेते आहेत. दोघांच्याही जशा जमेच्या बाजू आहेत, तशा कमकुवत बाबीही आहेत.
बीड जिल्ह्यात काम करत असलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर स्थानिक शिवसैनिकांनी पैसे घेऊन पदे वाटल्याचा आरोप केला होता. तर अंबादास दानवे यांच्यावर नुक्त्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मदत करून 18 कोटी रुपयांचा सौदा केल्याचा आरोप झाला होता. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याकडे वरिष्ठ नेतेही दुर्लक्ष करतात. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळाली तर ते पुन्हा पक्षाला उभारी देऊ शकतात, असे बोलले जाते.
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. तर उद्धव ठाकरेंचा पक्ष सध्या शांत बसला आहे. पक्षाला आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी तयार करायचे असेल तर मराठवाड्यात संघटनात्मक बांधणीसाठी मोठे अभियान राबवावे लागणार आहे. ते यशस्वीपणे राबवण्याची ताकद मराठवाड्यात अंबादास दानवे यांच्याशिवाय इतर कुठल्या नेत्यामध्ये सध्या तरी दिसत नाही.
चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते आहेत. पक्षाने त्यांना नगरसेवक, दोनवेळा आमदार, चारवेळा खासदार, उपनेते, नेते असे भरपूर काही दिले. लोकसभेतील दोन सलग पराभवानंतर आणि अंबादास दानवे यांच्यासोबत सातत्याने त्यांचे खटके उडत असल्याने त्यांनी स्वत:ला संघटनेपासून वेगळे केले आहे. नेते आले की ते दिसतात, इतर वेळी जिल्ह्यात अंबादास दानवे हेच एकहाती संघटना चालवतात. अशावेळी उद्धव ठाकरे यांना अंबादास दानवे यांच्याशिवाय जिल्ह्यात दुसरा सक्षम पर्याय सध्या तरी नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.