Satling Swami  Sarakarnama
मराठवाडा

Umarga Assembly Constituency News : आमदारकीसाठी सरकारी नोकरीवर पाणी, अधिकाऱ्याने घेतली स्वेच्छानिवृत्ती..

सरकारनामा ब्यूरो

अविनाश काळे

Umarga News : राजकीय क्षेत्राबद्दल जशी सर्वसामान्यांमध्ये ओढ असते तशीच ती शासकीय अधिकाऱ्यांमध्येही दिसू लागली आहे. कोणी राजकारणासाठी सरकारी नोकरीवर पाणी सोडतो, तर अनेकजण निवृत्तीनंतर आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी याच क्षेत्राला पसंती देतात. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या एका शासकीय अधिकाऱ्याने थेट स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक अधिकारी असलेल्या सातलिंग स्वामी यांनी विधानसभा निवडणूक लढवता यावी म्हणून सरकारी नोकरीवर पाणी सोडले. नुकतेच मराठवाड्याचे सेवानिवृत्त झालेले विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली. या शिवाय प्रशासनात काम करणारे अनेक वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी राजकारणात नशिब आजमावण्याच्या तयारीत आहेत. यात आता सातलिंग स्वामी यांची भर पडली आहे. (Umarga Assembly Constituency News)

उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी (MVA) या दोन प्रमुख पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून सक्षम पर्यायाच्या शोधात आहे.

दोन वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक अधिकारी सातलिंग स्वामी हे या मतदारसंघातून लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीच घेतल्याने ते उमरग्यातून निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

महाविकास आघाडीकडुन शिवसेनेचे विलास व्हटकर, प्रा. डॉ. संजय कांबळे, रमेश धनशेट्टी, विरपक्ष स्वामी, प्रशांत काळे, प्रा. डॉ. सुवर्णमाला नारायणकर, अशोक सरवदे, सदाशिव भातागळीकर यांची नावे चर्चेत आहेत. सातलिंग स्वामीही महाविकास आघाडीच्या संपर्कात असून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात तीन टर्मपासून शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. यावेळी उमरगा मतदारसंघात भाकरी फिरवण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. जातीय समीकरणे पाहता सत्ताधारी पक्षाला धूळ चारण्यासाठी सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे.

यात प्रामुख्याने माला जंगम समाजातील उमेदवार देण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे (Shivajirao Kalge) यांचे उमरगा शहरातील दोन मेव्हुणे बंधूच्या नावाची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. मात्र, सध्या तरी ते निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नसल्याचे बोलले जाते.

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले हे पहिल्या निवडणुकीत वर्गणी गोळा करुन निवडणूक लढले असले तरी आता ते सर्वसामान्य किंवा गरीब राहिलेले नाहीत. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी अमाप माया जमवली असल्याचा आरोप केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT