Vaibhav Chavan Audio Clip Sarkarnama
मराठवाडा

Vaibhav Chavan Audio Clip : वैभव चव्हाणने मृत्यूआधी कोणाची नावे घेतली? दोन ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा क्षेत्रात खळबळ

Two alleged audio clips linked Vaibhav Chavan have gone viral after his body was found in Imamapur. The recordings mention alleged threats and serious accusations involving the Kurash association and sports department officials : इमामपूर शिवारात वैभव चव्हाणचा मृतदेह आढळल्यानंतर प्रकरणाला नवे वळण; कथित ऑडिओ क्लिपमध्ये कुराश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह क्रीडा विभागातील काही अधिकाऱ्यांवर आरोप, आवाजाची सत्यता अद्याप स्पष्ट नाही.

Pradeep Pendhare

Vaibhav Chavan Death Case : बोगस खेळाडू प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्या उमेदवारांविरोधात तक्रार करून कथित रॅकेट उघड करणाऱ्या वैभव चव्हाण याचा मृतदेह इमामपूर शिवारात आढळल्याने खळबळ उडाली आहे. वैभवच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला असतानाच, आता त्याच्या नावाने दोन ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये वैभवने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत महाराष्ट्रातील कुराश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह क्रीडा विभागातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे वैभव चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कथित एका क्लिपच्या शेवटी आपल्या मृत्यूला आपण घेतलेल्या नावांमधील संबंधित व्यक्ती जबाबदार असतील, असे म्हणत त्याने 'जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्कलाब झिंदाबाद, जय शिवराय' अशा घोषणा दिल्याचे ऐकू येते.

वैभव चव्हाण याचा मृतदेह इमामपूर शिवारात आढळल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा आरोप केला होता. त्यातच आता समोर आलेल्या दोन कथित ऑडिओ क्लिपमुळे (Audio Clips) या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. या क्लिपमध्ये बोगस खेळाडू प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्याच्या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर आपल्याला कुठेही आणि कोणत्याही पद्धतीने मारले जाऊ शकते, अशी भीती वैभवने व्यक्त केल्याचे ऐकू येते.

समोर आलेल्या दोन ऑडिओ क्लिपपैकी पहिली क्लिप सुमारे दहा मिनिटांची, तर दुसरी सुमारे एक मिनिटाची आहे. दहा मिनिटांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये वैभव चव्हाण याचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. त्यात त्याने धाराशिव जिल्ह्यातील 2024-25 च्या पोलिस भरती (Police) प्रक्रियेत खेळाडू कोट्यातून अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराच्या पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे म्हटले आहे.

संबंधित उमेदवार बोगस खेळाडू असल्याचा संशय व्यक्त करून पुणे येथील क्रीडा आयुक्तालयाकडे तक्रार केल्याचेही या क्लिपमध्ये सांगितले आहे. या तक्रारीमुळे महाराष्ट्रातील कुराश संघटनेशी संबंधित कथित क्रीडा घोटाळा आणि रॅकेट समोर आल्याचा दावा वैभवने केल्याचे ऐकू येते. या प्रकरणामुळे कुराश संघटनेतील काही व्यक्ती आणि क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही त्याने व्यक्त केल्याचा दावा आहे. आपल्या संपर्कात संघटनेतील काही तरुण होते. आपण संबंधितांविरोधात काही केले, तर आपला अपघात घडवून आणला जाऊ शकतो किंवा घातपात केला जाऊ शकतो, अशी भीती त्यांना आधीच व्यक्त केल्याचेही या क्लिपमध्ये म्हटले आहे.

माझ्या मृत्यूला संबंधित जबाबदार असतील

कथित ऑडिओ क्लिपमध्ये वैभवने कुराश संघटनेच्या राज्यभरातील काही पदाधिकाऱ्यांची नावे घेतल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात आपला अपघात झाला किंवा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला, तर त्याला संबंधित संघटनेचे पदाधिकारी आणि क्रीडा विभागातील अधिकारी जबाबदार असतील, असे त्याने म्हटल्याचा दावा आहे. आपण कोणत्याही संघटनेविरोधात तक्रार करण्यासाठी नव्हे, तर एका उमेदवाराच्या वजन गटासंदर्भातील अनियमिततेबाबत तक्रार केली होती, असेही वैभवने स्पष्ट केल्याचे क्लिपमध्ये ऐकू येते. आपण क्रीडा आयुक्तालयाकडे पुराव्यांसह अर्ज पाठवला होता. पोलिसांकडे स्वतंत्रपणे कोणतीही तक्रार केली नव्हती, असा दावाही त्याने केला आहे. या प्रकरणात अर्ज लिहिण्यासाठी आणि माहिती अधिकारांतर्गत (RTI) अर्ज करण्यासाठी कोणी मदत केली होती, याची माहिती संघटनेतील संबंधितांना असल्याचेही त्याने म्हटल्याचे समजते. या प्रकरणाशी संबंधित पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्याने केला आहे.

गरीब घरात जन्म घेतला, हीच माझी चूक

दहा मिनिटांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये वैभवने आपल्या संघर्षाचाही उल्लेख केला आहे. सात ते आठ वर्षे मेहनत करूनही खेळाडू कोट्यातून संधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्याने व्यक्त केल्याचे ऐकू येते. गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे आणि खेळाडू कोट्यातून नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मानसिक तणाव निर्माण झाल्याचेही त्याने म्हटल्याचा दावा आहे. आपल्याला कोणाचीही दया नको, तर आपल्या हक्काची जागा हवी होती, अशी भावना त्याने व्यक्त केल्याचे क्लिपमध्ये ऐकू येते. कथित क्लिपच्या शेवटी आपल्या मृत्यूला आपण घेतलेल्या नावांमधील संबंधित व्यक्ती जबाबदार असतील, असे म्हणत त्याने 'जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्कलाब झिंदाबाद, जय शिवराय' अशा घोषणा दिल्याचे ऐकू येते.

दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये.....

दुसऱ्या सुमारे एक मिनिटाच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये वैभवने बोगस खेळाडूविरोधात तक्रार केल्यानंतर आपल्याला अनेकांचे फोन आल्याचा दावा केला आहे. या सर्व फोन कॉल्सचे रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सॲप चॅट आपल्याकडे असल्याचे त्याने म्हटल्याचे ऐकू येते. हे पुरावे आपण आमदार रोहित पवार आणि संदीपभैया क्षीरसागर यांच्या काही कार्यकर्त्यांसह मित्रांकडे पाठवून ठेवल्याचेही त्याने सांगितल्याचा दावा आहे. आपल्या जीवाला काही झाले, तर पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये घेतलेली नावे आणि संबंधित व्यक्तींचे कॉल रेकॉर्डिंग व चॅट तपासण्यात यावेत, असे त्याने म्हटल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील काही चॅट अजय चांगणे यालाही पाठवत असल्याचा उल्लेख दुसऱ्या क्लिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

ऑडिओ क्लिपची सत्यता आणि मृत्यूचे गूढ उकलणार का?

बोगस खेळाडू प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या मिळवण्याच्या कथित रॅकेटविरोधात तक्रार केल्यानंतर वैभव चव्हाण याचा मृतदेह आढळला. त्यानंतर नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. आता त्याच्या नावाने व्हायरल झालेल्या दोन ऑडिओ क्लिपमध्ये जीवाला धोका असल्याचा उल्लेख आणि काही व्यक्तींवर करण्यात आलेले गंभीर आरोप यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपमधील आवाज वैभव चव्हाण याचाच आहे का, क्लिपमधील दावे कितपत खरे आहेत आणि त्याच्या मृत्यूचा या कथित रॅकेटशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT