Vanjari Seva Sangh Letter To CM Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : जातीय तणाव, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या मनोज जरांगेंवर कारवाई करा! देवेंद्र फडणवीसांना पत्र

Vanjari Seva Sangh Letter To CM Devendra Fadnavis : आपण शासन म्हणून झुंडशाहीला न घाबरता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला स्मरून जे जे कायदेशीर दृष्टिकोनातून करता येईल ते करावे.

Jagdish Pansare

  1. वंजारी सेवा संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

  2. संघाचा आरोप आहे की, जरांगे यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडत आहे.

  3. सरकारने तातडीने कारवाई केली नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Vanjari Sevasangh Letter To CM : दसरा मेळाव्याच्या दिवशी नारायण गडावरून मनोज जरांगे यांनी केलेले भाषण आणि त्यातून वापरलेली भाषा याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. मंत्री पंकजा मुंडे यांनी निझाम राजवटीतील गॅझेट संदर्भात केलेले विधान, धनंजय मुंडे यांनी कुणाला फसवतायं असं म्हणत ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीवर केलेली टीका मनोज जरांगे पाटील यांच्या जिव्हारी लागली. या सगळ्यावर त्यांनी नारायण गडावरील आपल्या भाषणातून पलटवार केला. परंतु तो करताना वापरलेल्या भाषेवरून वंजारी समाज संतापला आहे.

वंजारी सेवा संघाने ओबीसींच्या विरोधात भडकाऊ भाषा वापरणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेल पाठवला आहे. कमरेखालची भाषा वापरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि राज्यातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचे काम जरांगे हे करत असल्याचा आरोप वंजारी सेवा संघाने आपल्या मेलमध्ये केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून मराठा आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे राहणार अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना हा व्यक्ती माळी धनगर वंजारी बंजारा व इतर सर्व ओबीसी जाती-जमातींच्या बाबतीत सातत्याने द्वेष भावना, चीड निर्माण करणारी, भडकाऊ वक्तव्य करत आहे. अनेकवेळा आंदोलनात आणि धार्मिक,अध्यात्मिक ठिकाणी केलेल्या भाषणात कमरेखालची भाषा वापरून सर्वांना लज्जा पोहोचेल अशा पद्धतीने बोलत आहे.

यामुळे महाराष्ट्रातील जातीय तणाव वाढत आहे. सामाजिक सलोखा बिघडत चाललेला आहे, अनेक गावागावात जरांगेच्या बोलण्या,वागण्यामुळे भांडणे होत आहेत. हे महाराष्ट्राला न शोभणारे, न परवडणारे आहे. जरांगे (Manoj Jarange) यांच्या बाबतीत काही मागण्या आम्ही करत आहोत. त्याची तात्काळ दखल घेऊन जरांगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व चिथावणीखोर वक्तव्याबद्दल गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी.

आपण शासन म्हणून झुंडशाहीला न घाबरता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला स्मरून जे जे कायदेशीर दृष्टिकोनातून करता येईल ते करावे. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला असणारे हे सुद्धा जरांगेच्या या कृतीला पाठबळ देत आहेत. त्यामुळे याबाबत तात्काळ कारवाई व्हावी याकरिता हे निवेदन आपणाला ईमेल द्वारे पाठवत आहोत.

या आहेत मागण्या

1. या जरांगेच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे अनेक अर्थात शेकडो तरुणांनी आणि व्यक्तींनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्.या तसेच काही गोरगरीब मराठा बांधवांचे अपघाती निधन झाले. आंदोलनावेळी सहभागी झाल्याने किंवा होताना या सर्व बाबीला जबाबदार धरून मनोज जरांगेवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

2. मीडियासमोर जाहीरपणे व समोर आया बहिणी बसलेल्या असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचे इतर सहकारी, लोकप्रतिनिधी यांना शिवराळ भाषा वापरून गलिच्छ शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर बाबी तपासून व सर्व मीडियाच्या माध्यमातून असणारे पुरावे तपासून तात्काळ गुन्हे दाखल करावेत.

3. मुंबई येथील आझाद मैदानावरील उपोषणाच्या वेळी धनगर समाजाबद्दल त्यांच्या पार्श्वभागात लाकूड घातले अशा पद्धतीची गलिच्छ भाषा जाहीरपणे मीडियासमोर वापरल्याने धनगर समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या. त्यांच्या मनामध्ये चीड निर्माण करण्याचा, त्यांना वेगळ्या पद्धतीने भडकावण्याचा, हिणवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जरांगेवर तात्काळ कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल करावेत.

4. माळी, धनगर, वंजारी, बंजारा, नाभिक आणि इतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून जाहीर पाहून घेण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत.

5. परवा दसऱ्याच्या नारायण गडावरील मेळाव्यात बोलताना मराठा समाजाविषयी मनोज जरांगे याने अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली. तुमची पैदास मराठ्याची आहे का? आणि असाल तर तुम्ही..... वगैरे वगैरे शब्द वापरून मराठा समाजाचा सुद्धा आध्यात्मिक व्यासपीठावरून अवमान आणि भावना दुखावण्याचे काम केले. त्याबाबतही माहिती घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत.

6. नारायण गडावरील व्यासपीठावरून वंजारी समाजाबाबत आणि या समाजाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनाही जाहीर पाहून घेतो, अशा धमक्या दिल्या प्रकरणी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा.

7. महाराष्ट्रातील छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यासारख्या लढवय्या ओबीसी नेत्यांबाबत सतत गलिच्छ आणि असंविधानिक भाषेत शिवीगाळ, धमक्या, अरेरावी, झुंडशाहीची भाषा वापरून सध्या महाराष्ट्रात जे काही जरांगेमुळे चालू आहे ते कायद्यानेच थांबू शकते. त्यामुळे या सर्व मागण्यांचा कायदेशीर दृष्टिकोनातून विचार करावा व यावर कायदे तज्ञांची एक समिती गठीत करून त्या अहवालानुसार महिन्याभराच्या आत त्याच्यावर सक्त कायदेशीर कारवाई करावी. तरच महाराष्ट्रातील वातावरण पूर्ववत व्हायला मदत होईल.

वरील सर्व या मागण्या संदर्भात तात्काळ वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय होऊन मनोज जरांगे या माथेफिरूवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा माधवबन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि वंजारी सेवा संघ असोसिएशन यांच्या वतीने येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यानंतर जे होईल त्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनावर असेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

FAQs

1. वंजारी सेवा संघाने कोणत्या कारणासाठी पत्र पाठवले?
👉 संघाने मनोज जरांगे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप करून अटकेची मागणी केली आहे.

2. हे पत्र कोणाला पाठवले आहे?
👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.

3. संघाने कोणता इशारा दिला आहे?
👉 सरकारने कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

4. मनोज जरांगे यांच्याबाबत वाद का निर्माण झाला आहे?
👉 आरक्षण आंदोलनातील त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि भूमिकेमुळे काही समाजघटक नाराज आहेत.

5. सरकारची यावर काय प्रतिक्रिया आहे?
👉 अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT