Vilasrao Deshmukh Abdul Sattar
Vilasrao Deshmukh, Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : मंत्री अब्दुल सत्तारांना झाली विलासराव देशमुखांची आठवण...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh News) यांची आज 79 वी जयंती. या निमित्ताने त्यांच्या लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनी गर्दी केली होती. विलासराव देशमुख काँग्रेस पक्षात होते, पण त्यांचे संबंध सगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांशी होते. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि विलासराव यांच्या मैत्रीच्या आठवणी अजूनही प्रत्येकाला भावतात. (Abdul Sattar News)

राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे पुर्वी काँग्रेसमध्ये (Congress) होते. विलासराव देशमुख यांच्याशी त्यांच्या फारसा संपर्क, संबंध आला नाही. माजी मुख्यमंत्री व आता भाजपचे खासदार असलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यामुळे सत्तार काँग्रेसमध्ये गेले होते. तर हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे अब्दुल सत्तार यांनी आज विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारी पोस्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून केली. (Vilasrao Deshmukh Birth Anniversary)

सरपंच ते मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे, प्रशासन हाताळण्याचे उत्तम कौशल्य असणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारे लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन, अशा शब्दांत सत्तार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सत्तार यांना अचानक विलासरावांची आठवण का बरं झाली असेल? अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात होत आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या जुन्या नेत्याच्या जयंतीची आठवण करून त्यांनी अभिवादन केले याबद्दल सत्तारांचे कौतुक, पण जर यामागे काही राजकीय हेतू, भविष्यातील वाटचाल ठरलेली असेल तर मात्र शंकेला वाव आहे. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात काँग्रेस पक्षातूनच केली. आमदार, मंत्री पदाला त्यांनी याच पक्षाच्या माध्यमातून गवसणी घातली होती. राज्य आणि देशातील राजकारणाची हवा अचूक ओळखून आपली वाटचाल करण्यात अब्दुल सत्तारांचा हातखंडा आहे. (Latest Political News)

सत्तारांनी आपल्या 25-30 वर्षाच्या राजकारणात अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी वेगळी भूमिका घेतली. थेट विरोधकांच्या म्हणजे भाजपच्या तंबूत शिरण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. परंतु सिल्लोड-सोयगांव या मतदारंसघातील भाजपच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी सत्तारांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला. यावर भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग शोधला आणि भाजपच्या वाट्याचा हा मतदारसंघ युतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस, दोन्ही शिवसेना आता परत...

त्यानंतर सत्तारांनी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा धनुष्यबाण हाती घेतला आणि संपुर्ण मतदारसंघात कधी शिवसेनेचा झेंडा दिसत नव्हता तो तालुका भगवामय करून टाकला. कॅबिनेटमंत्री पदाचा शब्द घेऊन शिवसेनेत गेले, विधानसभेला शिवसेना-भाजपची सत्ताही आली. पण महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि सत्तारांची बोळवण राज्यमंत्री पदावर झाली. त्यामुळे नाराज असलेल्या सत्तारांनी ती व्यक्त करण्याची संधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेतील बंडातून मिळाली. ही संधी अचूक हेरत सत्तार शिंदेंच्या सोबतच गेले नाही, तर या बंडामध्ये त्यांनी महत्वाची भूमिकाही बजावली.

त्यानंतर झालेल्या सत्तांतरात सत्तारांना कॅबिनेटपदी बढती, मतदारसंघासाठी कोट्यवधीचा निधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ जाता आले. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तार यांचे रंग काहीसे बदललेले जाणवले. जालना लोकसभा मतदारसंघात त्यांच्या भूमिकेविषयी संशय घेतला जात आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुर्वी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेला प्रासंगिक करार मोडून, पुन्हा नव्या पक्षाची वाट धरणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. अशावेळी सत्तारांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करणारी पोस्ट केली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांची भविष्यात पुन्हा काॅंग्रेमध्ये घरवापसी झाली तर नवल वाटायला नको.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT