Marathwada Political News : लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. या तयारीमध्ये जास्तीत जास्त मतदारांप्रमाणे पोहोचण्याचे टार्गेट पक्षांकडून ठेवण्यात आले आहे. मात्र, यंदाच्या लोकसभेचा निकाल हे तरुण मतदार ठरवतील. कारण नवीन मतदारनोंदणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आगामी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारनोंदणीला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करता यावे, यासाठी तरुणांमध्ये उत्साह दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात 27 हजार नवीन मतदारांनी आपली नोंदणी केल्याची माहिती आहे. सर्वाधिक नोंदणी ही उदगीर विधानसभा मतदारसंघात झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2024 पासून छायाचित्रासह मतदारनोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 22 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 18 ते 19 वर्षे वयोगटातील 26 हजार 924 नवमतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 6 हजार 131 नवमतदारांची नोंदणी झाली आहे.
हे नवमतदार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबरला जिल्ह्यात प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवमतदारांची नोंदणी तसेच मृत व दुबार नावे वगळणे, मतदानकार्ड, पत्त्यात दुरुस्ती अशा कामांसाठी 9 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. या अर्जावर 26 डिसेंबरपर्यंत कार्यवाही करण्यात आली.
मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांमध्ये ही मुदत आता 12 जानेवारी केली आहे, तर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी 22 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. यादरम्यान दुबार नावे, तसेच मृतांची नावे वगळणे हे काम प्रामुख्याने करण्याचे निर्देश सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासोबतच नवमतदारांनाही नोंदणीसाठी संधी देण्यात येणार आहे.
अंतिम मतदारयादी आता 5 जानेवारीऐवजी 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 22 जानेवारीनंतरही मतदारयादीमध्ये नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारनोंदणीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघात 3 हजार 136, लातूर शहर मतदारसंघात 4 हजार 364, अहमदपूर मतदारसंघात 6 हजार 44, उदगीर मतदारसंघात 6 हजार 131, निलंगा मतदारसंघात 3 हजार 794 आणि औसा मतदारसंघात 3 हजार 455 नवमतदारांनी नावनोंदणी केली आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.