Jaydatta Kshirsagar-Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Jaydatta Kshirsagar News : माजी मंत्री क्षीरसागरांना भाजपकडून निरोपाची शक्यता; म्हणूनच `वेट अँड वॉच` चा पावित्रा..

Datta Deshmukh

Beed Political News : आज कुठलाही पक्ष नाही, नव्या राजकीय समीकरणामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात संधी असल्याने पुतणे प्रवेशाची घाई करत असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मात्र ' थांबा योग्य वेळेची वाट पहा' असे सांगत होते. मात्र, पुतणे डॉ. योगेश यांनी स्वतंत्र प्रवेशाचा निर्णय घेतला. मग, माजी मंत्री क्षीरसागरांनीही या निर्णयात आपला सहभाग नसल्याचे आणि आपण कधीही स्वार्थासाठी निर्णय घेतले नसल्याचे जाहीर केले. त्यांना भाजपकडून आशावादी निरोप असल्याने क्षीरसागरांकडून `वेट अँड वॉच` चा संदेश दिला जात असल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडून तसा निरोप असून येत्या दोन महिन्यात जयदत्त क्षीरसागर यांना राजकीय 'सेटल आणि स्टेबल' केले जाणार असल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसी विचाराच्या दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालविणारे जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) पंचायत समिती सभापती, चार वेळा आमदार आणि उपमंत्री ते विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री राहिले. उच्चशिक्षित, राजकीय मुत्सद्दी, ओबीसी नेते असलेले जयदत्त क्षीरसागर महायुती सरकारच्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमवे आमदार होते.

मात्र, राष्ट्रवादी नेत्यांकडून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पाठबळ देऊन क्षीरगर यांना एकटे पाडले जात असल्याने त्यांनीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत उठबस वाढवली. (Beed News) अगदी स्वतः राष्ट्रवादीचे आमदार व भाऊ डॉ. भारतभूषण क्षीरसागर याच पक्षाचे नगराध्यक्ष असतानाही त्यांनी पक्षाच्या नेत्यांना टाळून शहरातील विकास कामांचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडेंच्या हस्ते केली.

लोकसभेला देखील थेट भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार केला. मात्र, एका म्यानात दोन तलवारी नको (पंकजा मुंडेही ओबीसी लीडर व जयदत्त क्षीरसागर देखील ओबीसी लीडर) म्हणून त्यांना भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश करावा लागला. शिवसेनेने देखील त्यांना मंत्रिपद दिले. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दरम्यान, महाविकास आघाडी सत्तेवर येऊन त्यांच्याच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे पण सरकारवर जेष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव असल्याने सत्तेच्या त्या काळात सत्तेच्या परीघपासून क्षीरसागर दूरच राहिले.

दरम्यान, शहरात तत्कालीन महाविकास आघाडी सरकार काळात नगरविकास विभागातून मंजूर झालेल्या ७९ कोटी रुपयांच्या रस्ते व नाली बांधकामांचे भूमिपूजन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले म्हणून त्यांना शिवसेनेतून (उबाठा) काढून टाकण्यात आले. मागच्या नऊ महिन्यांपासून क्षीरसागर बंधू राजकीय पक्षाविना आहेत. त्यांच्याकडून शिंदे शिवसेना किंवा भाजप प्रवेशाचे प्रयत्न देखील सुरु होते. मात्र, शिंदे शिवसेनेला मतदार संघात बेसवोटचा टक्का अत्यल्प तर भाजप प्रवेशात पंकजा मुंडे यांचा नकार त्यांच्या मार्गात मोठा अडथळा होता.

दरम्यान, आता नव्या राजकीय समीकरणामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवेशाची आलेली संधी साधवी असे पुतणे आणि काही समर्थक त्यांना सांगत होते. मात्र, या ठिकाणी प्रवेश केला तर स्थानिक पातळीवर धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारणे त्यांना ज्येष्ठतेमुळे नको वाटत होते. तर, क्षीरसागर एकदा स्टेबल आणि सेटल झाले तर पुन्हा 'डोईजड' होतील असे मुंडे आणि अमरसिंह पंडित यांना वाटत आहे. अखेर त्यांचे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी एकट्याने प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून हा सोहळा बुधवारी मुंबईत होणार आहे.

मात्र, क्षीरसागर यांच्या 'थांबा योग्य वेळेची वाट पहा' या संदेशामागचे कारण पुढे आले आहे. त्यांना भाजपकडून व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दोन महिन्यांत 'चांगले पद' देण्याबाबत शब्द दिल्याची माहिती आहे. जयदत्त क्षीरसागर ओबीसी लीडर असून त्यांची कात्यकर्त्यांची देखील मोठी फळी आहे. विशेष म्हणजे ते तौलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राज्यात विदर्भ व विशेषतः नागपूर भागात हा वर्ग मोठ्या संख्येने असल्याने जयदत्त क्षीरसागर यांचा तिकडे अधिक फायदा होईल असे भाजप नेत्यांचे गणित आहे. क्षीरसागरांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य किंवा संघटनेत मोठे पद मिळू शकते, अशी माहीती आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT