Beed News, 14 Jan : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराडच असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियासह विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.
वाल्मिक कराडची मंत्री धनंजय मुंडेंशी (Dhananjay Munde) जवळीक असल्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई केली जात नसल्याचा आरोपही केला जात आहे. याच मुद्द्यावरून सोमवारी संतोष देशमुख यांच्या भावाने आक्रमक भूमिका घेत स्वत:ला संपवून घेण्याचा इशारा देत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होत.
त्यानंतर आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे सीआयडीने सोमवारी आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) आवाजाचे नमुने घेतले आहेत. कारण या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी थेट संबंध असल्याचं बोलल जात आहे.
त्यामुळे आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरुन केलेल्या कॉलमधील व्यक्ती आणि वाल्मिक कराड यांचा आवाज जुळल्यास त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सीआयडीच्या पथकाने बीड पोलिस ठाण्यातून वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने गोळा केले आहेत. हा आवाजाचा नमुना खंडणी प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. तर यापूर्वी सीआयडीने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्या आवाजाचेही नमुने घेतले होते.
वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ही खंडणी वसून करण्यासाठी चाटे हा कंपनीच्या कार्यालयात गेला होता. यावेळी त्याने फोन लावून कंपनीच्या अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडसोबत फोनवरून बोलणे करुन दिल्याचा दावा केला जात आहे. तसंच अधिकारी विष्णू चाटे याच्यासोबत वाल्मिक कराडला भेटायलाही गेल्याचंही बोललं जात आहे. तर याच खंडणी प्रकरणामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे.
त्यामुळे वाल्मिक कराडलाही हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या SIT तील अनेक अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडसोबत फोटो असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ती एसआयटी बरखास्त करण्यात असून आता नवी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना या नव्या एसआयटीच्या प्रमुखपदी कायम ठेवण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.