Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण तापलं आहे.देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीच्या तपासानं वेग पकडला आहे. खंडणीसह सरपंच देशमुख हत्येप्रकरणातील संशयित वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यासह सर्वच फरार आरोपींभोवतीचा फास सीआयडीनं चांगलाच आवळल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, आता बीडमधून आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे.
संपूर्ण बीड जिल्ह्यातील संतापाचा उद्रेक,प्रचंड राजकीय दबाव आणि सीआयडी कडून एकापाठोपाठ सुरू असलेल्या वेगवान कारवाया यामुळे पुढच्या काही तासांत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सीआयडीकडून दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराड याच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती. आता या प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. या आदेशानंतर सीआयडीने वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींविरोधात मोठं पाऊल उचलतानाच त्यांची संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच नातेवाईकांचीही बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
याअगोदर वाल्मिक कराड याच्याविरोधात पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण अद्याप सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) संशयित आरोपी म्हणूनच कराडकडे पाहिले जात आहे.खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आरोपी आहे. मात्र, खूनप्रकरणी त्याला पोलिसांनी आरोपी केलेले नाही. त्यामुळे कोणत्या गुन्ह्यात पोलिसांकडून कराडला नेमकी अटक केली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात सीआयडीची एन्ट्री झाल्यापासून तपासाने चांगलाच वेग पकडला आहे.तर दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून (AnJali Damania) देशमुख हत्याप्रकरण उचलून धरलं आहे. त्यांनी बीडमधील गुन्हेगारीवर बोट ठेवत आरोपी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी व खंडणी प्रकरणातील फरार आरोपींसाठी सीआयडीचा (CID) नऊ पथकांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात जवळपास दीडशे अधिकारी अन् कर्मचारी यांच्याकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून फरार वाल्मीक कराड यांच्यासह चारही आरोपींचे बँक खाते गोठवले आहेत. सीआयडीकडून आरोपींचे मोबाईल डेटा तपासण्यात येत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
याचवेळी रविवारी(ता.29) सीआयडीकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यासह तब्बल 40 पदाधिकाऱ्यांची सुमारे आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. या हत्येप्रकरणातील चौकशीबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.